अहमदनगर Live24 टीम, 7 मे 2021 :- कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे भारतामध्ये निर्माण झालेली भयावह स्थिती ही संपूर्ण जगासाठी धोक्याची घंटा आहे, असा इशारा युनिसेफ दिला आहे.
सातत्याने बिघडत चाललेल्या या स्थितीत जगाने भारताची मदत करण्याची आवश्यकता आहे, असेही यूएनच्या संस्थेने म्हटले आहे.
दुसरीकडे, अमेरिका-भारत व्यवसाय परिषद अर्थात यूएसआयबीसीनेही भारतातीली ही गंभीर स्थिती कायम राहिल्यास संपूर्ण जग दहशतीखाली असेल, असे म्हटले आहे.भारतातील कोरोना महामारीचे संकट झपाट्याने वाढत चालल्याने स्थिती भीषण झाली आहे.
अशा स्थितीत भारताला तातडीने मदत करण्याची गरज अमेरिका-भारत व्यवसाय परिषद अर्थात यूएसआयबीसीच्या अध्यक्षा निशा देसाई-बिस्वाल यांनी वृत्तसंस्थेला मुलाखत देताना व्यक्त केली. जर भारतात कोरोनामुळे भयावह स्थिती असेल, तर संपूर्ण जगासाठी देखील ही धोक्याची बाब आहे.
त्यामुळे सर्वांनी एकत्र येत भारताची मदत करण्याची आवश्यकता आहे, असे बिस्वाल म्हणाल्या. भारतातील स्थिती बिघडत चालल्याचे अमेरिकन कंपन्यांना सर्वप्रथम लक्षात आले होते. भारतातील या कंपन्यांच्या कर्मचाऱ्यांकडून त्यांना माहिती मिळत होती.
त्यामुळेच जवळपास दोन आठवड्यापूर्वीच या कंपन्यांनी भारताला मदत करण्यासाठी जमावाजमव करण्यास सुरुवात केली होती.
जवळपास ४० कंपन्यांच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी मिळून तयार झालेल्या नव्या जागतिक कृती दलाकडून व्यापक पातळीवर भारताला मदत करण्याची घोषणा करण्यात आली आहे.
याअंतर्गत भारताला १००० व्हेटिंलेटर आणि २५००० ऑक्सिजन कॉन्सेट्रेटर्स पाठवले जाणार आहेत. यासाठी कृती दल अमेरिकन सरकार आणि भारतीय सरकारसोबत मिळून काम करत आहे.
मदतीसाठी पुढाकार घेत असलेल्यांमध्ये फेसबुक, ॲमेझॉन, गोल्डमॅन सॅक्स, बँक ऑफ अमेरिका, ॲमवे, क्वालकॉम, व्हीएमवेअर आणि युनियन पॅसिफक सारख्या कंपन्यांचा समावेश आहे.
एसेंचर आणि मायक्रोसॉफ्टकडून देखील या दिशेने प्रयत्न केले जात आहेत, तर मदत अभियानात आयबीएमकडून महत्त्वाची भूमिका बजावली जात आहे. डेलायट इंडियाचे मुख्य कार्यकारी अधिकारी पुतीन रंजेन यांनी देखील भारताला मदत करण्याची वेळ आली असल्याचे म्हटले आहे.