अहमदनगर Live24 टीम, 15 जुलै 2021 :- अहमदनगर शहर जिल्हा महिला काँग्रेसच्या वतीने शहर काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष किरण काळे यांच्या नेतृत्वाखाली अभिनवरित्या निदर्शने करत
देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना गॅस दरवाढ कमी करण्याच्या मागणीसाठी केंद्र सरकारचा निषेध म्हणून चक्क शेणाच्या गौऱ्या कुरियर द्वारे दिल्लीला पाठविण्यात आल्या आहेत.
तसेच निवासी उपजिल्हाधिकारी यांच्यामार्फत पंतप्रधानांना हिंदीतुन निवेदन पाठविले आहे. नगर शहरात जिल्हा महिला काँग्रेसच्या वतीने गॅस दरवाढीच्या विरोधात मोहीम राबवली जात आहे.
गॅस दरवाढ कमी करण्याच्या मागणीसाठी नरेंद्र मोदींना पाठविण्यात आलेल्या शेणाच्या गौऱ्या हातात धरून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर जोरदार निदर्शने करण्यात आली.
पंतप्रधानांना पाठविलेल्या हिंदी निवेदनामध्ये महिला काँग्रेस पदाधिकाऱ्यांनी म्हटले आहे की, देशात इंधनाचे दर दिवसेंदिवस वाढत आहे. त्यातच गॅस दर प्रचंड वाढले असून गगनाला भिडले आहेत. कोरोना महामारीमुळे आमचे मासिक उत्पन्न घटले आहे.
अनेक आप्तेष्टांना, जवळच्यांना आम्ही या महामारीत गमावले आहे. एका बाजूला हे दुःख आणि आर्थिक संकट असताना दुसऱ्या बाजूला केंद्र सरकारने गॅसच्या दरांमध्ये भरमसाठ वाढ केल्यामुळे आमच्या महिला वर्गाचे जगणे मुश्किल झाले आहे.
केंद्र सरकारच्या मर्मावर बोट ठेवत या निवेदनात महिला काँग्रेस पदाधिकाऱ्यांनी म्हटले आहे की भारतीय जनता पार्टी सत्तेत नसताना थोडी जरी गॅस दरवाढ झाली तर भारतीय जनता पार्टीचे नेते, महिला, कार्यकर्ते हे रस्त्यावर उतरत जोरदार निदर्शने, आंदोलन करायचे.
आता तर देशात भाजपची सत्ता आहे. तरी सुद्धा भाववाढ होतच आहे. पण त्यावेळी आंदोलन करणारे भाजपचे कार्यकर्ते आता कुठे गायब झाले आहेत ? असा सवाल या निवेदनामध्ये महिला काँग्रेस पदाधिकारी यांनी उपस्थित केला आहे.