येणाऱ्या काळात महागाई कंबरडे मोडणार !

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम, 21 जून 2021 :-  आंतरराष्ट्रीय पातळीवर खनिज तेलाच्या किमती होणाऱ्या वाढीमुळे देशात इंधनाचे दर गगनाला भिडले आहेत.

त्याचा परिणाम महागाईवर होत असून येणाऱ्या काळात त्यात अधिकच वाढ होणार असल्याचे दिसून येत आहे. परिणामी, महागाई सर्वसामान्यांचे कंबरडे मोडणार आहे. सार्वजनिक क्षेत्रातील पेट्रोलियम कंपन्यांनी रविवारी इंधनाच्या दरात पुन्हा वाढ केली.

पेट्रोलच्या दरात प्रति लिटर २९ पैसे, तर डिझेल प्रति लिटर २८ पैशांनी महागले आहे. मागील सात आठवड्यांत इंधनाच्या दरात तब्बल २७ वेळा वाढ करण्यात आली आहे. नव्या दरवाढीमुळे राजधानी दिल्लीत पेट्रोल प्रति लिटर ९७ रुपये,

तर डिझेल ८८ रुपये इतके झाले आहे. मुंबईत पेट्रोल १०३.३६ रुपये प्रति लिटरवर पोहोचले आहे, तर डिझेलचे दर ९५.४४ रुपये प्रति लिटर इतके आहे. हा आलेख असाच चढता राहिल्यास महागाईत आणखी वाढ होणार असल्याचे दिसून येत आहे.

इंधनाच्या दरात वाढ झाल्याने जीवनावश्यक वस्तूंच्या किमतीवर देखील त्याचा परिणाम होत आहे. फळे, भाज्या, अन्नधान्यासह इतर वस्तूंचा पुरवठा करणाऱ्या मालवाहतूकदारांना देखील त्याचा फटका बसत आहे.

सरकारकडून इंधनाचे दर कमी करण्याबाबत काहीच हालचाल होताना दिसून येत नसल्याने सर्वसामान्यांकडून रोष व्यक्त केला जात आहे.

मागील आठवड्यात केंद्र सरकारकडून जाहीर करण्यात आलेल्या महागाई दराच्या आकडेवारीनुसार, महागाई दराने आतापर्यंतचा उच्चांक गाठला आहे.

अहमदनगर लाईव्ह 24

Published by
अहमदनगर लाईव्ह 24