भारतात दिवाळी हा सण उत्साहात साजरा केला जातो. याच दिवाळी सनातील तिसरा दिवस म्हणजे नरक चतुर्दशी होय. नरक चतुर्दशीला पहाटे सूर्योदयाच्या आधी उठून अभ्यंगस्नान करून दीपदान करण्याची प्रथा आहे. आपण नरक चतुर्दशी विषयी सर्व माहिती आजच्या लेखाच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत. अनेक रूढी परंपरा, नरक चतुर्दशी साजरी करण्याची पद्धत, त्यामागील पौराणिक कथा, नरक चतुर्दशी चे महत्व या सर्व विषयांवर देखील आपण माहिती जाणून घेऊयात.
नरक चतुर्दशी माहिती
नरक चतुर्दशी ही धनत्रयोदशी च्या दुसऱ्या दिवशी असते. आश्विन कृष्ण पक्षातील चतुर्दशीला श्रीकृष्णाने नरकासुराचा वध करून सृष्टीला संकटापासून मुक्त केले.नरकासुर हा पृथ्वी चा पुत्र होता तरी देखील पृथ्वीने त्याच्या वधानंतर शोक न करता आनंदोत्सव साजरा करण्यास सांगितले. यातून स्वतःच्या वयक्तिक विचारपेक्षा इतरांचे सुख आणि आनंद कायम शीर्षस्थानी असावा अशी शिकवण मिळते.
2021 नरक चतुर्दशी
2021 साली 3 नोव्हेंबर रोजी आपण नरक चतुर्दशी साजरी करतो आहे. नरक चतुर्दशीला अभ्यंगस्नान करण्यास महत्व आहे कारण श्रीकृष्णाने नरकासुर वध केल्यानंतर अंगावर सांडलेले रक्त हे तेल लावून धुतले होते आणि वाईट गोष्टींना देहापासून दूर केले होते. त्याप्रमाणे नरक चतुर्दशीला अभ्यंगस्नान मुहूर्त हा पहाटे 5:03 ते 6:38 असा आहे. याकाळात तुम्ही अभ्यंगस्नान करून दीपदान देखील करावे.
नरक चतुर्दशी पूजा विधी
नरक चतुर्दशीच्या दिवशी पहाटे उठून अभ्यंगस्नान करण्यास महत्व आहे. तुम्ही या दिवशी सकाळी लवकर उठून अंघोळीच्या बादलीत तीळ टाकून अंगाला तेल लावून स्नान करावे. त्यांनतर सुर्यादेवाला अर्ध्य अर्पण करण्यासाठी बाहेर यावे. अर्ध्य अर्पण करावे. शरीराला तुम्ही चंदन पेस्ट किंवा सध्या बाजारात उपलब्ध असलेले उटणे देखील लावू शकता.
श्रीकृष्ण भगवान, हनुमान आणि यमराज यांची देखील पूजा या दिवशी केली जाते. रात्री सर्वत्र पणत्या लावून विद्युत रोषणाई करून अंधारावर मात केली जाते.
छोटी दिवाळी
दिवाळीच्या एक दिवस आधी हा सण असतो आणि त्यामुळे या दिवशी आपण दिवाळी प्रमाणे सकाळ पासून आनंदी क्षण अनुभवत असतो. सकाळी अभ्यंगस्नान झाले की दिवे दान केले जातात. त्यानंतर रात्रीच्या वेळी देखील सर्वत्र दरवाजात, खिडक्यांमध्ये आणि इतरही ठिकाणी आपण दिवे लावून परिसर उजळवून टाकत असतो.
नरक चतुर्दशी विषयी कथा
नरकासुर वध
आपण श्रीकृष्ण कालखंडात गेलो तर आपल्याला नरकासुराचा श्रीकृष्णाने केलेला वध ही कथा नक्कीच आठवेल. या नरकासुराच्या वधाचा आणि श्रीकृष्णाचा संबंध हा नरक चतुर्दशी सोबत आहे.
पृथ्वीच्या पोटातून बाहेर आलेला असुरांचा एक अवतार म्हणजे नरकासुर होय. त्याने वराह अवतार धारण केला होता. विष्णूने जेवहा पृथ्वीचा उद्धार केला होता तेव्हा नरकासुराचा जन्म झाला.
एक आख्यायिका असे देखील सांगते की या नरकासुराचा जन्म हा रावण वधानंतर झाला होता. जानकी म्हणजे सीता मातेचा जन्म ज्या यज्ञाच्या ठिकाणी जमिनितुन झाला तिथेच या नरकासुराचा देखील जन्म झाला. राजा जनक याने नरकासुराचे 16 वर्षांपर्यंत पालन पोषण केले. त्यानंतर मात्र पृथ्वीने त्याला विष्णुकडे पाठविले. भगवान विष्णू यांनी त्याला प्राग्यज्योतिषपूर या राज्याचा राजा बनविले.
नरकासुर कसा अभेद्य होता याचे उदाहरण म्हणजे त्याला विष्णूचा वरदहस्त होता. त्याचे आणि मथुरेच्या कंस राजाचे मैत्रीपूर्ण संबंध होते. नरकासुराचा विवाह हा विदर्भ राज्याची राजकुमारी माया यांच्याशी झाला. त्याच्या विवाह प्रसंगी विष्णूने त्याला एक रथ भेट दिला होता. हा रथ अभेद्य असा होता.
नरकासुर अगदी सुरळीत आणि शांततेत राज्यकारभार सांभाळत होता मात्र संगत त्याला बिघडवत गेली. त्याला बानासुराने बिघडविले. नरकासुर देखील एखाद्या असुराप्रमाणे दृष्ट बनला. त्याचे हे प्रताप बघून वशिष्ठ ऋषींनी त्याला भगवान विष्णूच्या हातून तुझा वध होईल असा शाप दिला.
नरकासुर खूप हुशार होता. त्याने या शापाला टाळण्यासाठी ब्रह्मदेवाची तपश्चर्या केली. त्याने भव्य यज्ञ आणि पूजा पाठ केले. त्याने ब्रह्मदेवाकडून वर मागून घेतला की त्याचा वध कोणीच करू शकणार नाही. यालाच पुराणात ‘अवध्यत्वा’ असे म्हणले गेले आहे. या वरदानाने तो जवळपास अमर झाला होता. अहंकार इतका होत गेला की त्याने अनेक राजांना हरवून त्यांच्या मुलींना पळवून मनिपर्वतावर एक नगर वसवून तिथे बंद करून ठेवले. त्याने जवळपास 16,100 स्त्रिया पळवून नेल्या व बंदी बनविल्या होत्या असे पुराणात नमूद केलेले आहे.
अनेक राजांना, देव देवतांना, गंधर्वाना आणि मानवांना आता नरकासुर त्रासदायक ठरला होता. त्याने देवांमध्ये माता अदिती चे कुंडले पळविली होती. वरून राजाचे त्याने विशाल छत्र बळकावले होते.
प्राग्यज्योतिषपूर मध्ये नरकासुर रहात होता. हे त्याच्या राजधानीचे ठिकाण होते. जमिनीवरून तर तिथे कोणीच जाऊ शकत नव्हते कारण वाटेत या नगरीला पाणी, अग्नी आणि खंडकांचे संरक्षण होते.
भगवान श्रीकृष्णाने गरुड रथात स्वार होऊन या नरकासुरावर आक्रमण केले. अखेर त्याच्या देहाचे दोन तुकडे करत श्रीकृष्णाने नरकासुर हे असुरी पर्व संपविले. सर्वत्र आनंदी आनंद झाला.
नरकासुरावर श्रीकृष्णाने मिळविलेला विजय म्हणून आपण नरक चतुर्दशी साजरी करत असतो. नरकासुराचा वध करताना श्रीकृष्णाच्या शरीरावर रक्त पडले आणि ते काढण्यासाठी श्रीकृष्णाने तेल लावून अंघोळ केली म्हणून ही अभ्यंगस्नान करण्याची प्रथा सुरू झाली.
भगवान श्रीकृष्णाने त्या 16,100 स्त्रियांना समजात प्रतिष्ठा मिळणार नाही म्हणून स्वतः त्यांच्याशी विवाह करून त्यांना समाजात एक मानाचे स्थान मिळवून दिले.
रंतीदेव आणि मोक्ष
एकेकाळी एका सुंदर अशा नगरीमध्ये रंतीदेव नावाचा एक राजा राज्य करत होता. राजा सद्गुणी होता त्याने कधीच कोणाला त्रास होणार नाही असेच निर्णय घेतले होते. तो स्वतःपेक्षा रयतेचा जास्त विचार करत असे. मात्र जेव्हा त्याला घ्यायला यमराज आले तेव्हाच मात्र त्याला कळाले की त्याला मोक्ष नाही तर नरक मिळाला आहे. यावर त्याच्या मनात प्रश्न आला की त्याने एकही पाप केले नाही तर मग त्याला नरक यातना का भोगाव्या लागणार आहेत?
यावर यमदूताने कारण सांगितले की त्याने एका नजर चुकीने एका ब्राम्हण भिक्षुक्याला उपाशी पोटी मोकळ्या हाताने परत पाठविले आहे. यावर रंती देव म्हणले की मला वेळ द्यावा जेणेकरून मी माझी चूक सुधारू शकेल. रंती देवाने आधी केलेल्या चांगल्या कामांमुळे त्याला ही संधी देण्यात आली.
गुरुकडे रंती देवाने विचारणा केली की यावर उपाय काय असेल? गुरूने सांगितले की 1 हजार ब्राह्मणांना बोलावून त्यांचे आदरातिथ्य करून त्यांची क्षमा माग म्हणजे तुम्हाला मोक्ष मिळेल. सर्व ब्राम्हण खुश झाले आणि रंती देवाला मोक्ष मिळाला!
हा दिवस म्हणजे कार्तिक कृष्ण पक्षातील चतुर्दशी होय. त्यामुळे या चतुर्दशीला नरक निवारण चतुर्दशी असे म्हणले जाते.
नरक चतुर्दशी आणि रूप चतुर्दशी संबंध
एकेकाळी हिरण्यगभ नावाचा एक राजाला राज्य करत होता. त्याने राज्यकारभार सोडून तपश्चर्या करायचे ठरविले. त्याने अनेक वर्षे तपश्चर्या केली मात्र पुढे जाऊन त्याच्या शरीरात कृमी झाली.त्याने त्याची ही समस्या नारद मुनींना सांगितली. यावर नारद मुनी म्हणाले की तू जेव्हा तपश्चर्या करतोय तेव्हाच शरीराची काळजी घेत नाहीयेस. यावर उपाय विचारला असता नारद मुनींनी सांगितले की कार्तिक महिन्याच्या कृष्ण चतुर्दशीला पहाटे उटणे लावून अभ्यंगस्नान करून भगवान श्रीकृष्णाची पूजा आणि आरती कर. असे केल्याने तुला तुझे जुने सौंदर्य मिळेल.
हिरण्यगभ ने नारदांनी सांगितलेले सर्व काही केले. त्याला त्याचे जुने शरीर आणि सौंदर्य पुन्हा मिळाले. त्याला त्याचे रूप पुन्हा मिळाले म्हणून नरक चतुर्दशीला रूप चतुर्दशी असे देखील म्हणतात.
नरक चतुर्दशी किंवा रूप चतुर्दशी विषयी आजच्या या लेखाच्या माध्यमातून आपण सर्व माहिती बघितली. अनेकांना या दिवसाचे महात्म्य माहीत नसते, तरी ते देखील या लेखाच्या माध्यमातून नरक चतुर्दशीच्या कथेतून समजले असेल. 2021 साली नरक चतुर्दशी कशी साजरी करावी आणि त्याचा पूजा विधी काय आहे हे देखील या लेखाच्या माध्यमातून आपण जाणून घेतले. तुम्हाला सर्वांना नरक चतुर्दशी च्या हार्दिक शुभेच्छा!!