कोरोनामुळे बंद असलेल्या शाळा सुरु होत नसल्याने लोकसहभागातून शाळा सुरु करण्याचा उपक्रम

Published by
Ahmednagarlive24 Office

अहमदनगर Live24 टी म, 22 सप्टेंबर 2021 :-  महाराष्ट्रात दीड वर्षापेक्षा जास्त कालावधीपासून बंद असलेल्या शाळा सुरु होत नसल्याने पीपल्स हेल्पलाईन, भारतीय जनसंसद व मेरे देश मे मेरा अपना घर आंदोलनाच्या वतीने सुरु करण्यात आलेल्या शैक्षणिक पालकशाही अभियानातंर्गत नांदगाव (ता. नगर) पासून मैदानी लोकशाळा सुरु करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

कोरोनानंतर राज्यातील पहिली मैदानी लोकशाळा नांदगाव ग्रामस्थांच्या पुढाकारातून शनिवार दि.25 सप्टेंबर रोजी भरविण्यात येणार असल्याची माहिती सखाराम सरक यांनी दिली. कोरोना काळात शाळा बंद असल्याने विद्यार्थ्यांचे मोठे नुकसान होत असून, एक पिढी बर्बाद होण्याच्या मार्गावर असल्याचा आरोप संघटनेच्या वतीने करण्यात आला आहे.

राज्यातील शाळा सुरु होण्यासाठी संघटनांच्या वतीने सरकारकडे आग्रह धरण्यात आला असून, आंदोलन देखील करण्यात आले. मात्र सरकार शाळा उघडण्यास तयार नसल्याने संघटनांनी ग्रामस्थांशी चर्चा करुन मैदानी लोकशाळा सुरु करण्याचा निर्णय घेतला आहे.

मुलांना शिकवण्यासाठी गावातील उच्च शिक्षित युवक-युवतींचा सहभाग घेतला जाणार आहे. हे युवक विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष शिक्षणाचे धडे देणार आहे. दररोज तीन वर्ग कोरोनाचे नियम पाळून भरविण्यात येणार आहे. विद्यार्थ्यांना पालकांनी जेवणाचा डबे, पाणी बॉटल, छत्री व बसण्यासाठी लहान चटई बरोबर देण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

प्रार्थनेच्या वेळेस विद्यार्थ्यांना केळीचे वाटप केले जाणार आहे. शिक्षण देत असताना विद्यार्थ्यांचे आरोग्य सदृढ राहण्यासाठी सकस आहार देऊन त्यांना योग, प्राणायामचे धडे देखील दिले जाणार आहेत. हसत खेळत त्यांना मैदानावर शिक्षण दिले जाणार आहे.

तर कोरोनाशी लढण्यासाठी त्यांची रोगप्रतिकारशक्ती वाढविण्यासाठी प्रयत्न करण्यात येणार असल्याचे अ‍ॅड. कारभारी गवळी यांनी म्हंटले आहे. विद्यार्थ्यांचे होणारे शैक्षणिक नुकसान थांबविण्यासाठी मैदानी लोकशाळा ही संकल्पना पुढे आली आहे.

लोकसहभागातून ही चळवळ यशस्वी होणार असून, शाळा उघडे पर्यंत ही चळवळ चालवली जाणार आहे. कोरोनाचा बागुलबुवा करुन अधिक काळ शाळा, महाविद्यालये बंद ठेवता येऊ शकत नाही.

ऑनलाईन शिक्षण मुलांसाठी निकामी असून, प्रत्यक्ष शाळा सुरु होण्यासाठी नियोजन करण्याची गरज असल्याची भावना अशोक सब्बन यांनी व्यक्त केली आहे.

संपुर्ण जिल्ह्यातील गावा-गावात मैदानी लोकशाळा सुरु होण्यासाठी अ‍ॅड. गवळी, सरक, अशोक सब्बन, प्रा.सुभाष कडलग, सुधीर भद्रे, शाहीर कान्हू सुंबे, अशोक भोसले, जसवंतसिंग परदेशी, अशोक डाके, पोपट साठे, सुनिल टाक, कैलास पठारे,

बाळासाहेब पालवे, रईस शेख, विठ्ठल सुरम, राम धोत्रे, साहेबराव पाचारणे, वीरबहादूर प्रजापती, पोपट भोसले, ज्ञानदेव चांदणे आदी प्रयत्नशील आहेत.

Ahmednagarlive24 Office