अहमदनगर Live24 टी म, 20 सप्टेंबर 2021 :- पारनेर तालुक्यात वादग्रस्त तहसीलदार ज्योती देवरे यांची बदली होऊनही अवैध वाळूउपसा काही केल्या थांबत नसल्याने अन्याय निवारण समितीचे जिल्हाध्यक्ष अरुण रोडे यांनी पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांच्याकडे वाळू माफियांवर कारवाई करण्याची निवेदनाद्वारे मागणी केली आहे.

तर पारनेर तालुक्यात वाळू माफियांनी हैदोस घातला असताना, अवैध वाळू उपशावर कारवाई होईल का? असा प्रश्‍न उपस्थित केला आहे. अनेक वर्षापासून पारनेर तालुक्यात वाळू माफिया छुप्या पद्धतीने किंवा काही अधिकार्‍यांना हाताशी धरून त्यांचा अर्थपूर्ण आशीर्वाद घेऊन वाळूतस्करी करत आहे.

नुकतेच तहसिलदार ज्योती देवरे यांचे प्रकरण राज्यभर गाजले त्यांच्यावर भ्रष्टाचाराची चौकशी लावण्यात आली. कामात अनियमितता असे कारण देत त्यांची तडकाफडकी जळगाव येथे बदली करण्यात आली. त्यानंतर तालुक्यात तहसीलदारचा तात्पुरता कार्यभार नायब तहसीलदारांकडे देण्यात आला.

त्यामुळे तालुक्यात वाळू माफियांनी पुन्हा एकदा धुमाकूळ घालण्यास सुरुवात केली आहे. अवैध वाळू व्यवसायामुळे पारनेर तालुक्यातील अनेक रस्ते खराब झाले आहेत. तर वाळूच्या डंपरमुळे अनेक लहान-मोठे अपघात होत आहेत.

यामध्ये काहींचा जीव देखील गेला आहे. वाळू माफियांच्या हैदोसाने सर्वसामान्य जनतेला जगणे मुश्किल झाले असून, पारनेर तालुक्यात नागरिकांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले आहे.

अवैध वाळू व्यवसाय विरुद्ध तक्रार करूनही तक्रारीची दखल घेतली जात नाही. प्रशासकीय यंत्रणेकडून खोट्या गुन्ह्यांमध्ये अडकवून आवाज दाबला जात असल्याचे रोडे यांनी निवेदनात म्हंटले आहे.

पारनेर तालुक्यातील तहसीलदार ज्योती देवरे यांचे अवैध वाळू व्यवसायांशी अर्थपूर्ण संबंध होते. टाळेबंदीतही वाळू व्यवसाय सुरु होता. मागील नऊ महिन्यांपासून अवैध वाळू व्यवसाय बंद होण्यासाठी पाठपुरावा करून,

तर अनेक वेळा उपोषण, आंदोलन करून देखील प्रशासनाच्या वरदहस्ताने वाळू व्यवसाय सुरु असल्याचा आरोप रोडे यांनी केला आहे. सध्या पारनेर तालुक्यात मोठ्या प्रमाणात अवैध वाळूउपसा सुरु असून, वाळू माफियांना आवरण्यासाठी कारवाई करण्याची पोलिस अधिक्षकांकडे मागणी करण्यात आली आहे.