चेअरमन व्यवहारे यांनी सैनिक बँकेत आर्थिक घोटाळा केल्यानेच चौकशी- बाळासाहेब नरसाळे

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम, 23 जुलै 2021 :-  सैनिक सहकारी बँकेत चेअरमन शिवाजी व्यवहारे, मुख्यकार्यकारी अधिकारी संजय कोरडे यांनी आर्थिक घोटाळा केला असून, त्याचे पुरावे आमच्याकडे असल्याने विभागीय सहकार आयुक्त स्वत: चौकशी करत आहेत.

त्यामुळे शिवाजी व्यवहारे यांनी साळसूद पणाचा आव न आणता सुरू असलेल्या चौकशीला कागदपत्रे उपलब्ध करून द्यावेत असा सल्ला सैनिक बँकेचे स्वीकृत संचालक बाळासाहेब नरसाळे यांनी दिला आहे.

सैनिक बँकेत गैरव्यवहार, घोटाळे झाला असल्याने सैनिक बँक संस्थापक तथा जेष्ठ समाजसेवक आण्णासाहेब हजारे यांनी सहकार आयुक्तांना पत्र देत चौकशी करावी अशी मागणी केली होती. त्यानुसार विभागीय आयुक्त स्वतः चौकशी करत आहे.

त्या चौकशीला कागदपत्रे उपलब्ध करून देण्यास मुख्यकार्यकारी अधिकारी विलंब लावत आहेत. परिणामी चौकशी अहवाल तयार होण्यास उशीर होणार आहे. बँकेचे चेअरमन शिवाजी व्यवहारे यांनी पत्रकार परिषद घेत तक्रार करणार्‍या सभासदावर वैयक्तिक आरोप केले आहेत.

पण बँकेत केलेल्या भ्रष्टाचारा बाबत तोंडावर बोट ठेवले आहे. बँकेत केलेल्या गैरव्यवहारावर स्पष्टीकरण देण्याची आवश्यकता असताना वैयक्तिक टीका टिप्पणी ते करत आहेत. व्यवहारे यांनी सैनिक बँकेत स्वत:च्या मुलाला सेवेत घेतले होते.

आमच्या तक्रारीमुळेच त्याला व संचालकांच्या नातेवाईकांना बँक सेवेतून नारळ देण्याची नामुष्की आली आहे. कर्जत शाखेत शासकीय रकमेवर डल्ला मारला आहे ती जबाबदारी कोणाची?, वकील फी वर अवाढव्य खर्च कोणी केला?,

तुमचा कारभार चांगला तर मग 4 गुन्हे कशापायी दाखल झाले आहेत?, कर्मचारी भरायचे होते तर सभासदांच्या पाल्यांनां का संधी दिली नाही?, मुलासह संचालक नातेवाईक का भरले होते?, व्यवहारे यांनी एकहाती मनमर्जी कारभार केला त्यामुळेच काही संचालक विरोधात गेले.

कारभार चांगला असता तर एकाच दिवशी 1 हजार 405 नियमबाह्य नातेवाईक सभासद करण्याची वेळ तुमच्यावर का आली?, विनातारण कर्ज वाटप का केले?

हे प्रश्‍न बाळासाहेब नरसाळे, विनायक गोस्वामी यांनी उपस्थित करीत वरील मुद्दयावर स्पष्टीकरण देण्याचे म्हंटले आहे. चोर तो चोर वर शिरजोर!, या उक्तीप्रमाणे वागू नये असा मार्मिक टोला त्यांनी चेअरमन व्यवहारे यांना लगवला आहे.

अहमदनगर लाईव्ह 24