पेट्रोल, डिझेल, गॅस दरवाढीच्या विरोधात काँग्रेसने चक्क घोड्यावरून बाजारपेठेत फेरफटका मारत केले तीव्र आंदोलन

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम, 7 जून 2021 :- पेट्रोल, डिझेल, गॅस दरवाढीच्या विरोधात आज नगर शहरामध्ये आगळेवेगळे आंदोलन काँग्रेसने केले. शहर काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष किरण काळे यांनी पदाधिकारी, कार्यकर्त्यांसह बाजारपेठेत चक्क घोड्यावरून फेरफटका मारत आंदोलन करून नागरिकांचे भाव वाढीवर लक्ष वेधले.

बाजारपेठेमध्ये काँग्रेसच्या या अनोख्या आंदोलनाची दिवसभर चर्चा सुरू होती. यावेळी नागरिक आणि व्यापाऱ्यांनी आंदोलकांचे मोबाईल मध्ये फोटो टिपले. बघ्यांची गर्दी झाली होती. काँग्रेसच्या वतीने महाराष्ट्रामध्ये सर्व ठिकाणी पेट्रोल, डिझेल , गॅस दरवाढीच्या विरोधामध्ये विधिमंडळ पक्षनेते, महसूल मंत्री ना बाळासाहेब थोरात, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष आ.नाना पटोले यांच्या आदेशावरून आंदोलने होत आहेत.

नगर शहरामध्ये किरण काळे यांच्या नेतृत्वाखाली आज सर्जेपुरातील सबलोक पेट्रोल पंपाच्या ठिकाणी काँग्रेसने तीव्र निदर्शने करीत आंदोलन केले. यावेळी ब्लॉक काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष मनोज गुंदेचा, जिल्हा उपाध्यक्ष बाबासाहेब धोंडे, शहर जिल्हा उपाध्यक्ष अनंतराव गारदे, उपाध्यक्ष खालील सय्यद, विद्यार्थी काँग्रेसचे प्रभारी अनिस चुडीवाला, क्रीडा काँग्रेसचे अध्यक्ष प्रवीणभैय्या गीते पाटील,

युवक काँग्रेस अध्यक्ष ॲड. अक्षय कुलट, विद्यार्थी काँग्रेस शहर जिल्हाध्यक्ष वीरेंद्र ठोंबरे, नगर तालुका विद्यार्थी काँग्रेस अध्यक्ष सुजित जगताप, इंटक जिल्हाध्यक्ष हनीफ शेख, सेवादल महिला शहर जिल्हाध्यक्ष कौसर खान, सेवादल शहर जिल्हाध्यक्ष डॉ. मनोज लोंढे शहर जिल्हा सरचिटणीस नलिनी गायकवाड, ज्येष्ठ नेत्या जरीना पठाण, अल्पसंख्यांक काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष अज्जूभाई शेख,

शहर जिल्हा सचिव प्रशांत वाघ, शहर जिल्हा सचिव मुबिन शेख, खजिनदार मोहनराव वाखुरे, आदी उपस्थित होते. पेट्रोल पंपावर निदर्शने झाल्यानंतर काँग्रेसच्या वतीने नगर शहरातील बाजारपेठेमध्ये घोड्यावरुन भाजप सरकारच्या विरोधामध्ये सर्जेपुरा ते एमजी रोड वरील घास गल्ली चौकापर्यंत प्रतीकात्मक मिरवणूक काढण्यात आली.

या घोड्यावरती शहर काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष स्वतः किरण काळे हे विराजमान झाले होते. ते मोदी सरकारच्या विरोधामध्ये दरवाढीच्या विरोधात घोषणा देत होते. तर कार्यकर्ते त्यांच्या मागे घोषणा देत होते. यामुळे बाजारपेठ दणाणून गेली होती. यावेळी कार्यकर्त्यांनी दुचाकी गाड्या लोटत सरकारच्या विरोधात आपला रोष व्यक्त केला.

आंदोलनात्मक मिरवणुकीचा समारोप प्रसंगी बोलताना किरण काळे म्हणाले की, पेट्रोलचे दर १०० रुपयांच्या पुढे गेले आहेत. डिझेलचा भाव ९२ रुपयाला येऊन ठेपला आहे. स्वयंपाकाच्या गॅसचे दर ९०० रुपयांच्या पुढे गेले आहेत. मोदी सरकारने कोरोना संकट काळामध्ये मोठ्या प्रमाणावर डिझेल, पेट्रोल, गॅस यांच्यावरती कर लादत लाखो कोटी रुपयांचा नफा मिळवला असून

सामान्य माणसाला मात्र महागाईच्या खाईत मध्ये ढकलले आहे. पूर्वी घरामध्ये दोन माणसं कमावती असली तरी देखील घराचे खर्च भागत होते. महिलांचे किचनचे बजेट कोलमडत नव्हते मात्र कोरोना संकट आल्यापासून आधीच आर्थिक विवंचनेत सापडलेली सर्वसामान्य जनता ही या दरवाढीमुळे आता घरातील सर्व माणसे काम करून देखील घर खर्च भागवू शकत नाहीत.

ही विदारक वस्तुस्थिती आहे. त्यामुळे महागाईचा आगडोंब उसळला असून सर्वसामान्य माणसांमध्ये केंद्र सरकार बद्दल तीव्र संतापाची लाट निर्माण झाली असल्याचे यावेळी बोलताना किरण काळे म्हणाले. यावेळी मनोज गुंदेचा, खलील सय्यद, अनंत गारदे, अनिस चुडीवाला आदींची भाषणे झाली.

अहमदनगर लाईव्ह 24