अहमदनगर Live24 टीम, 15 जून 2021 :- कोरोना काळात कायद्याचे राज्य जाऊन साम, दाम व दंडाचे राज्य असतित्वात आले असून, कायद्यासह उन्नतचेतनेचे राज्य निर्माण होण्यासाठी पीपल्स हेल्पलाईन, भारतीय जनसंसद व मेरे देश मे मेरा अपना घर आंदोलनाच्या वतीने पुढाकार घेण्यात आला आहे.
ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून नागरिकांना उन्नतचेतनेचा आग्रह धरण्यात येणार असल्याची माहिती अॅड. कारभारी गवळी यांनी दिली. कायद्याचे राज्य ही संकल्पना कोरोना काळात राबविण्यात आली नसल्याने अनागोंदी निर्माण झाली.
तर उन्नतचेतनेचा अभाव असल्याने देशाची प्रगती खुंटली आहे. कायद्याच्या राज्याबरोबर उन्नतचेतना ही महत्त्वाची व गरजेची संकल्पना आहे. सारासार विवेक व लोककर्तव्याचा समावेश उन्नतचेतनेत आहे. भारताच्या राष्ट्रगीतामध्ये अधिनायक हा शब्द जनतेच्या ठिकाणी उन्नतचेतनेचा एकत्रित बाब म्हणून उच्चारलेला आहे.
देशाच्या स्वातंत्र्यानंतर पाश्चात्य शिक्षण पध्दती स्विकारल्याने मुळ स्वरुपातील भारतीयांमधील उन्नतचेतना लोप पावली. स्वत:चे हित, संपत्ती व प्रतिष्ठा याच्यात नागरिक गुंतल्याने भ्रष्टाचाराचे साम्राज्य पोसले गेले. जातीच्या व धर्माच्या उतरंडी निर्माण झाल्या.
विश्वात एक वैश्विक चैतन्य असून, निसर्गाचे नियम असल्याचे शास्त्रज्ञांनी गणिताने सिध्द केले आहे. उन्नतचेतनेचा विकास झाल्यास धर्मा-धर्मातील वाद संपुष्टात येऊन जाती व्यवस्था नष्ट होणार आहे. स्त्रियांना मान सन्मान मिळून इतर वंचित घटकांना देखील न्याय मिळणार असल्याचे संघटनांच्या वतीने स्पष्ट करण्यात आले आहे.
भारतात न्यायसंस्थेला अधिक महत्त्व देण्यात आले आहे. मात्र न्यायसंस्थेत उन्नतचेतनेचा अभाव असल्याने कायदा कृष्णवीवर मध्ये अडकला आणि कायद्याचे राज्य ही संकल्पना मोडित निघाली. देशात सर्वसामान्यांना कोरोनाची लस मिळणे देखील अशक्य झाली आहे.
पुढार्यांचे नातेवाईक, कार्यकर्ते व हितचिंतकांना लस उपलब्ध करुन देण्यात येत आहे. नागरिकांच्या मतांवर डोळा ठेऊन राजकीय पुढारी लसीकरण मोहिमेत स्वारस्य दाखवित आहे. ही अनागोंदी उन्नतचेतनेच्या अभावातून निर्माण झाली असल्याचा आरोप अॅड. गवळी यांनी केला आहे.
या मोहिमेसाठी अॅड. गवळी, अशोक सब्बन, कॉ. बाबा आरगडे, माजी गुलगुरु सर्जेराव निमसे, जालिंदर बोरुडे, प्रकाश थोरात, शाहीर कान्हू सुंबे, विठ्ठल सुरम, हिराबाई ग्यानप्पा, अशोक भोसले आदी प्रयत्नशील आहेत.