अहमदनगर Live24 टीम, 4 जून 2021 :- कोरोनाची संख्या काहीशी घटली तोच नागरिक बिनधास्त झाल्याचे चित्र सध्या शेवगाव तालुक्यात दिसून येत आहे.
अत्यावश्यक सेवा वगळता बाजारपेठेतील इतर साहित्याची दुकाने बंद असूनही नागरिक विनाकारण रस्त्यावर गर्दी करून प्रशासनाच्या नियमांची पायमल्ली करत आहे.
यामुळे नागरिकांची बेफिकीरी कोरोनाच्या तिसर्या लाटेला आमंत्रण देऊ लागली असल्याचे चित्र दिसून येत आहे. रुग्णसंख्येत होणारी घट दिलासादायक ठरत असतानाच ‘ब्रेक द चेन’अंतर्गत लागू केलेल्या कडक निर्बंधांचे नागरिकांकडून सर्रास उल्लंघन सुरू आहे.
कोरोना लस आली असली तरी कोरोनाचा धोका पूर्णत: टळलेला नाही. ज्यांनी कोरोनाचा धोका ओळखला ते नागरिक घरात राहूनच काळजी घेताना दिसून येत आहेत.
कोरोना संसर्गाची साखळी तोडण्यासाठी ‘ब्रेक द चेन’अंतर्गत कडक निर्बंध लागू केले आहेत. केवळ अत्यावश्यक सेवांना मुभा देण्यात आली आहे.
बाजारपेठेतील इतर दुकाने बंद आहेत. केवळ अत्यावश्यक असेल तरच घराबाहेर पडण्याचे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.
तरीदेखील मोठ्या प्रमाणात नागरिक बाजारपेठेत, रस्त्यावर येऊन गर्दी करताना दिसत आहेत. आधीच कोरोनाची दुसरी लाट किती विघातक होती याचा प्रत्यय नागरिकांना आला आहे.
मात्र तरीही नागरिक जबाबदारीने वागायला तयार नाही आहे. दरम्यान रस्त्यावरील वाढत्या गर्दीमुळे कोरोनाचा संसर्ग रोखणार तरी कसा, असा प्रश्न उपस्थित होऊ लागला आहे.