अहमदनगर Live24 टीम, 26 जून 2021 :- महापौर बाबासाहेब वाकळे यांच्या अध्यक्षतेखाली शुक्रवारी महापालिकेत सर्वसाधारण सभा झाली. सभेच्या सुरुवातीला अमृत भुयारी गटार योजनेचा विषय चर्चेला आला.
योजनेच्या कामावरून सदस्य चांगलेच अक्रमक झाले. ठेकेदार महापालिकेचा जवाई आहे का, असा सवाल उपस्थित करत ठेकेदाराकडून मलिदा मिळत असल्याने अधिकारी त्याला पाठीशी घालत आहेत, असा गंभीर आरोप सदस्यांनी सभागृहात केला.
राष्ट्रवादीचे नगरसेवक प्रकाश भागानगरे यांनी अमृत योजनेचा मुद्दा उपस्थित करत प्रशासनाला खडेबोल सुनावले. भुयारी गटार योजनेच्या ठेकेदाराने अक्षरश: रस्त्याची चाळण केली आहे. रस्त्यात खोदलेल्या खड्डयांत पडून अनेकजण गंभर जखमी झाले.
दोन दिवसांपूर्वी एक महिला छोट्या मुलासह खड्डयात पडली. ठेकेदारावर कारवाई न करता पाठीशी घातले जात आहे, असा आरोप भागानगरे यांनी केला. महापौर वाकळे यांचे कारवाईचे आदेश अमृत योजनेचे काम घेतलेला ठेकेदार स्वत: कधीच बैठकीला आला नाही.
बिल मात्र न चुकता घेऊन जातो. अधिकारीही अशा ठेकेदाराचे बिल काढून देतात, ही बाब गंभीर आहे. जेवढा ठेकेदार जबाबदार आहे, तेवढेच अधिकारीही जबाबदार आहेत. अधिकाऱ्यांवर कारवाई करा, असा आदेश महापौर वाकळे यांनी दिला.
आयुक्तांचे स्पष्टीकरण ठेकेदाराला कदापि पाठीशी घालणार नाही. वेळेत काम पूर्ण केले नाही, तर ठेकेदाराविरोधात पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात येईल, असे आयुक्त शंकर गोरे यांनी महापौरांनी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना सांगितले.