अहमदनगर Live24 टीम, 26 एप्रिल 2021 :-कोरोनाची दुसरी लाट भयंकर असून यामध्येही कोणीही निष्काळजीपणा करू नये.
गाव पातळीवर ग्राम दक्षता समिती अधिक सक्रिय करताना घरोघर जाऊन प्रत्येकाची तपासणी करा. तापाचे काही लक्षणे आढळल्यास तातडीने त्या व्यक्तींचे संस्थात्मक विलगीकरण करावे,
अशा सूचना महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी पदाधिकारी व प्रशासनाला केल्या आहेत. अमृतवाहिनी इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये संगमनेर तालुक्यातील कोरोना परिस्थिती उपाययोजना व आढावा बैठकीत मंत्री थोरात बोलत होते.
यावेळी आमदार डॉ. सुधीर तांबे, नगराध्यक्ष दुर्गाताई तांबे, इंद्रजीत थोरात, सभापती सुनंदाताई जोर्वेकर, जि.प. सभापती मीराताई शेटे, डॉ. हर्षल तांबे, उपसभापती नवनाथ अरगडे, उपनगराध्यक्ष शैलेश कलंत्री, विश्वासराव मुर्तडक,
जिल्हा परिषद सदस्य अजय फटांगरे, रामहरी कातोरे, सिताराम राऊत, मिलिंद कानवडे, प्रांताधिकारी डॉ. शशिकांत मंगरुळे, तहसीलदार अमोल निकम, नगरपालिकेचे मुख्याधिकारी डॉ. सचिन बांगर, उपविभागीय पोलिस अधिकारी राहुल मदने,
गटविकास अधिकारी सुरेश शिंदे, पोलीस निरीक्षक मुकुंद देशमुख, पांडुरंग पवार, वैद्यकीय अधिकारी डॉ. सुरेश घोलप, डॉ. संदीप कचोरीया, डॉ. राजकुमार जराड, कार्यकारी संचालक जगन्नाथ घुगरकर,
अमृतवाहिनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी अनिल शिंदे आदी उपस्थित होते. मंत्री थोरात म्हणाले, ग्रामीण भागामध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव वाढतो आहे. त्यामुळे ग्रामपंचायत सदस्य, पंचायत समिती सदस्य, नगरसेवक,
जिल्हा परिषद सदस्य यासह प्रत्येक पदाधिकाऱ्यांनी आपल्या विभागात व प्रभागात अधिक लक्ष देऊन नागरिकांना मार्गदर्शन करावे.
कोणत्याही कुटुंबांमध्ये एका व्यक्तीला तापाचे किंवा अन्य काही लक्षणे आढळल्यास त्याचे होम क्वारंटाईन करून तातडीने संस्थात्मक विलीगीकरण करा. प्रशासनातील कर्मचाऱ्यांनी घरोघर जाऊन तपासणी केली.
तर आपल्याला रुग्ण शोधता येतील. या काळात भावनेपेक्षा वस्तुस्थितीला महत्त्व द्या. घरातील एका व्यक्तीला कोरोणाची लागण झाली असेल तर त्याची ट्रीटमेंट विलगीकरण करून तातडीने करा. जेणेकरून इतरांना त्याची बाधा होणार नाही, असे ते म्हणाले.