अहमदनगर Live24 टीम, 20 जून 2021 :- कोरोना महामारीच्या संकटकाळात जीवाची पर्वा न करता गाव खेडयात, वाडी वस्तीवर जाउन कोरोना आटोक्यात आणण्यासाठी काम करणा-या राज्यातील आशा सेविका हया ख-या कोरोना योध्दया आहे.
कठीण परिस्थितीमध्ये जीव धोक्यात घालुन काम करणा-या माताभगिनींना स्वतःच्या उदरनिर्वाहासाठी मिळणा-या तुटपुंज्या मानधनाच्या विरोधात संपावर जाण्याची वेळ येते, हे महाविकास आघाडी सरकारचे अपयश असल्याची टीका भारतीय जनता पार्टीच्या प्रदेश सचिव, माजी आमदार स्नेहलता कोल्हे यांनी केली.
कोल्हे म्हणाल्या, आशा सेविकांचे प्रश्न या सरकारने गांभीर्याने घ्यावेत, कोरोना काळामध्ये आशा सेविकांनी केलेल्या कामामुळे प्रशासनाला खूप मोठी मदत झाली आहे. या महामारीच्या काळात हा प्रमुख घटक काम करत असल्याने रूग्णसंख्या आटोक्यात आली.
ग्रामीण व शहरी भागामध्ये आशा सेविका व गटप्रवर्तकांनी प्राथमिक आरोग्य केंद्र, लसीकरण केंद्र, विलगीकरण कक्ष याठिकाणी सकाळपासून ते संध्याकाळपर्यंत काम केले.
परंतु त्यांच्या मागण्यांकडे हे सरकार दुर्लक्ष करणार असेल तर त्यांनी पुकारलेल्या काम बंद आंदोलनामुळे राज्यामध्ये रूग्णसंख्या वाढू शकते. आशा सेविकांना या महामारीच्या काळात खूप वेळ काम करावे लागले. या कठीण काळात स्वतःचे घरदार सांभाळून अहोरात्र काम करावे लागले.
स्वतःच्या जीवावर उदार होऊन, कुटुंबाची पर्वा न करता राष्ट्रीय कर्तव्य समजून काम केले, कुटुंबाचा चरितार्थ चालविण्यासाठी धडपड करणाऱ्या महिलांना त्यांच्या कामाचा मोबदला देण्यासाठी पैसा नसल्याचे सरकार सांगत आहे, ही निश्चितच दुर्दैवाची बाब आहे. उपस्थित आशा सेविकांनी संतप्त भावना व्यक्त केल्या.