अहमदनगर Live24 टीम, 3 सप्टेंबर 2021 :- ‘आधी पाऊस नव्हता म्हणून पीके वाया गेली, उरली सुरली होती ती थोड्याफार पाण्यावर तगली होती पण काही कळायच्या आत तीपण अतिवृष्टीच्या पावसात वाहून गेली असून साहेब आमच्या शेतीचं लय वाटोळं झालं.

पुराच्या पाण्याने बंधारे फुटून गेले, जमिनी वाहून गेल्या, कांदा-कपाशी, बाजरी पाण्यात पव्हत आहे. आता आमची परिस्थिती आगीतून निघून फुफाट्यात पडल्यासारखी झालीय आम्हाला मदत करा’, अशी व्यथा मांडवे शिरापूर तिसगाव त्रिभुवनवाडी घाटशिरस शिराळ या परिसरातील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांनी मदत व पुनर्वसन राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांच्यासमोर पोटतिडकीने मांडली.

नुकत्याच झालेल्या अतिवृष्टीने शेतकर्‍यांच्या शेतीच्या झालेल्या नुकसानीची पाहणी आज मदत व पुनर्वसन राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांनी पाथर्डी तालुक्यातील नुकसानग्रस्त परिसराला भेट देऊन प्रत्यक्ष पाहणी केली आणि शेतकऱ्यांशी संवाद साधून त्यांना धीर दिला.

यावेळी मंत्री प्राजक्त तनपुरे यांनी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना विश्वास देत, शेतकरी बांधवांनो तुम्ही काळजी करू नका मी नुकसानीची पाहणी करायला आलोय. तुम्हाला नुकसान भरपाई मिळवून देणारच मात्र तुम्ही धीर खचू देऊ नका, या शब्दात हताश झालेल्या नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना धीर दिला.

30 ऑगस्ट रोजी झालेल्या ढगफुटीमुळे पाथर्डी तालुक्यातील सर्व गावांचे बंधारे, पाझर तलाव पाण्याने तुडुंब भरले तसेच एकाच वेळी तलाव ओव्हरफ्लो झाल्याने नदी नाले ओसंडून वाहू लागले आहे. पाण्याच्या अतिदाबामुळे नदीवर बांधलेले काही ठिकाणी बंधारे वाहून गेले असून त्यामुळे नदीकाठच्या अनेक शेतकऱ्यांची जमीन देखील पिकासह वाहून गेली असल्याचे शेतकऱ्यांनी यावेळी मंत्रीमहोदयांच्या निदर्शनास आणून दिले.

अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामे त्वरित सुरू करा, एकही नुकसानग्रस्त शेतकरी पंचनाम्यापासून आणि मदतीपासून वंचित राहता कामा नये, प्रत्येक नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना शासनाची मदत मिळालीच पाहिजे या सकारात्मक हेतूने कामाला लागा अशा स्पष्ट सूचना व निर्देश पाथर्डी तालुक्यातील मांडवे येथे मंत्रीमहोदयांनी प्रशासकीय अधिकाऱ्यांना दिले.

कृषी कर्मचारी, तलाठी पंचनामे करण्यासाठी आले नाही तर तात्काळ माझ्याशी संपर्क साधावा असे आवाहन ही त्यांनी केले. ज्या ठिकाणी पावसाच्या पाण्यामुळे बंधाऱ्याजवळील शेतकऱ्यांच्या जमिनी वाहून गेल्या त्या ठिकाणी जिल्हा परिषदेच्या पाणीपुरवठा विभागामार्फत तात्काळ आवश्यक दुरुस्ती करण्याच्या सूचना मंत्रीमहोदयांनी दिल्या. ज्या शेतकऱ्यांच्या शेळ्या-कोंबड्या व इतर पशुधन पुराच्या पाण्यात वाहून गेले आहे

त्यांना देखील मदत करण्याची ग्वाही यावेळी मंत्रीमहोदयांनी दिली. शेतकऱ्यांच्या पिकाचे व जमिनीच्या झालेल्या नुकसानीची मदत मिळवून देण्यासाठी आपले प्रयत्न राहणार असल्याचे मंत्री श्री. तनपुरे यांनी यावेळी उपस्थित शेतकऱ्यांना सांगितले. यावेळी माजी जि. प. अध्यक्ष बाबासाहेब भिटे, माजी सभापती संभाजी पालवे, शिवशंकर राजळे, राजेंद्र म्हस्के, अनिल रांधवणे, भारत वाढेकर,

सरपंच राजेंद्र लवांडे, उपसरपंच गणेश शिंदे, रवींद्र मुळे, राजेंद्र पाठक, पांडुरंग शिदोरे, सतीश लोमटे, गणेश पालवे, सुनील पुंड, शरद पडोळे, किसन पाठक, महेश लवांडे, बाबा बुधवंत, अविनाश कारखेले, भाऊसाहेब लवांडे, मधुकर लवांडे आदी उपस्थित होते.