file photo

अहमदनगर Live24 टीम, 4 सप्टेंबर 2021 :-  माझ्या विरोधात निवडणुकीत ज्यांचे डिपाॅझिट जप्त झाले. ते माझ्या दृष्टिकोनातून अदखलपात्र विषय आहेत. आयटी पार्क हे काही आपल्या राजकारणाचे व्यासपीठ नाही, असा टोला आमदार संग्राम जगताप यांनी किरण काळे यांना नाव न घेता लगावला. पत्रकार परिषदेला उपमहापाैर गणेश भोसले, स्थायी समिती सभापती अविनाश घुले उपस्थित होते.

आमदार जगताप म्हणाले, स्वतःच्या कामातून नेतृत्व निर्माण करावे लागते, केवळ आरोप करून प्रसिद्धी मिळवायचा काळ आता राहिलेला नाही. आम्ही कधी प्रतिसाद किंवा उत्तर दिले नाही, पण आयटी पार्क हा नगरसाठी महत्त्वाचा भाग आहे. या ठिकाणी स्टार्टअप कंपन्या तेथे आणण्यास यशस्वी आम्ही झालो.

त्या काही आमच्या मालकीच्या कंपन्या नाहीत. कालचा प्रकार चुकीचा आहे, काही लोकांनी तेथे जाऊन धिंगाणा केल्याने, भीतीचे वातावरण झाले. आम्ही त्यांना सांगितले घाबरू नका, कोणतीही अडचण येणार नाही, याची शाश्वती दिली. आयटी पार्कसाठी आमचे प्रयत्न सुरू असताना काही जण ते बंद पडण्याचा प्रयत्न करतात.

पण आम्ही तसे होऊ देणार नाही. त्या लोकांच्या पाठिशी उभा राहू, हे रोपटे अाहे. त्याचे वटवृक्ष करण्याचा प्रयत्न करणार आहोत. माझे आवाहन आहे की, नगरच्या आयटी सेक्टरबाबत चुकीचा संदेश जाईल, असे कोणी वागू नये. आयटी या शब्दात काय आहे, याची माहिती अगोदर घ्यावी, पण काही जण अज्ञानातून बोलू शकतात.

ज्यांना आयटीत कोणता भाग येतो, हेच माहिती नाही, त्यांच्याशी काय चर्चा करायची ? आमचे लोक चर्चेसाठी तयार आहेत, प्रश्नोत्तरासाठीही तयार आहोत. मी काही आयटी क्षेत्रातला तज्ञ नाही, असा टोलाही नाव न घेता आमदार जगताप यांनी लगावला.