अहमदनगर Live24 टीम, 30 नोव्हेंबर 2021 :- श्रीरामपूर शहरात हातात तलवारी घेऊन वाढदिवस साजरा करणे काहींना चांगलेच महागात पडले आहे. याप्रकरणी पोलिसांनी 7 जणांविरूद्ध गुन्हा दाखल करून तीन जणांना अटक केली आहे.
पोलीस कॉन्स्टेबल बाळासाहेब गुंजाळ यांनी दिलेल्या फिर्यादीवरून शहर पोलीस ठाण्यात ओम त्रिभुवन, तेजस मोरे व अनिकेत शेळके (रा. गोंधवणी) यांच्यासह 7 जणांविरूद्ध गुन्हा दाखल केला आहे.
यातील ओम त्रिभुवन, तेजस मोरे व अनिकेत शेळके यांना अटक करण्यात आली आहे. याबाबत अधिक माहिती अशी कि, शहरातील काझीबाबा रोड परिसरात रात्रीच्या सुमारास काहीजण रस्ता अडवून वाढदिवस साजरा करीत असल्याची माहिती मिळाल्यावरून पोलीस निरीक्षक संजय सानप यांनी पथकासह घटनास्थळी भेट दिली.
संबंधित ठिकाणी काहीजण बेकायदेशीर जमाव जमवून हातात तलवारी घेऊन संगीताच्या तालावर आरडाओडा करत नाचत असल्याचे निदर्शनास आले. पोलिसांनी त्याच्याकडील 4 हजार रुपये किमतीच्या दोन तलवारी जप्त करीत त्यांना अटक केली.