कोल्हापूर : कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदार संघामध्ये पोटनिवडणूक लागली आहे. भाजप (BJP) आणि काँग्रेसच्या (Congress) उमेदवारांमध्ये जोरदार टक्कर पाहायला मिळत आहे. महाविकास आघाडी (Mahavikas Aghadi) विरुद्ध भाजप अशी प्रतिष्ठा पणाला लागलेली दिसत आहे. त्यामुळे भाजपने पक्षाचा वचननामा जाहीर केला आहे.
कोल्हापूर उत्तर विधानसभा पोटनिवडणूक (Kolhapur North Assembly by-election) लागली असून भाजप आणि महाविकास आघाडीचे दिग्गज नेते प्रचारासाठी मैदानात उतरल्याचे दिसत आहे. या वाचननाम्यामध्ये अगोदर केलेली विकास कामे आणि नंतर करणार करणार असलेली विकास कामे याचा उल्लेख दिला आहे.
कोल्हापूरच्या (Kolhapur) सर्वांगिण विकासासाठी भाजपा सरकारच्या काळात भरीव निधी उपलब्ध करून दिला. केंद्र सरकारनेही पंचगंगा नदी प्रदुषणमुक्त करण्यासाठी नदी संवर्धन योजनेअंतर्गत निधी उपलब्ध करुन दिला,
त्यामुळे सांगेल ते करणार आणि करेल तेच सांगणार हा भाजपाचा बाणा असून, भाजपाचा जाहिरनामा हा आमच्यासाठी वचननामा आहे असे सांगण्यात आले आहे.
पाणीपुरवठा आणि ड्रेनेजसाठी अमृतनिधी योजनेस भाजपाने निधी दिला. त्यासोबतच शहरांतर्गत विकासकामांसाठी 100 कोटी, सीपीआर आणि शासकीय महाविद्यालयासाठी 100 कोटी, चित्रनगरी, शास्त्रीनगर ग्राऊंडसाठी तीन कोटी,
शहरातील केबल्स भूमिगत करण्यासाठी केंद्र सरकारकडून भरीव निधी, एमएनजीएल अंतर्गत पाईपलाईनद्वारे गॅस पुरवठा काम भाजपकडून करण्यात आल्याचे वचननाम्यात सांगण्यात आले आहे.
तरुण-तरुणींच्या आत्मनिर्भर वाटचालीसाठी विशेष प्रयत्न, महिला सबलिकरण, सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेत सुधारणा, पर्यावरण स्नेही कोल्हापूरसाठी विशेष प्रयत्न, कला, क्रीडा सांस्कृतिक क्षेत्राच्या विकासावर भर, सदृढ व निरोगी कोल्हापूर साठी विशेष प्रयत्न यावर भर देण्यात आला आहे.
त्यासोबतच शहरातील सर्व मिळकत धारकांना प्रॉपर्टी कार्ड बनवून देणे, शहरातील रस्ते नव्या अर्बन डिझाईन गाईडलाईन्सनुसार होण्यासाठी प्रयत्न, शहरातील सर्व प्रमुख चौकांचे सुशोभीकरण,
बांधकाम व्यवसायिक आणि वैयक्तिक घरांचे बांधकाम करणाऱ्यांचा त्रास वाचविण्यासाठी एक खिडकी योजनेची प्रभावी अंमलबजावणीसाठी प्रयत्न, विविध समाजघटकांसाठी बहुउद्देशीय सभागृहांची उभारणी, ट्रेजरी कार्यालयानजिक मुलांसाठी खेळण्यासाठी मैदाने विकसित करणे,
परमाळे सायकल ते रवी बॅंक येथील फेरीवाल्यांचे पुनर्वसन, यादवनगर भागात स्वच्छतागृहांचा विकास, बिंदू चौक व महालक्ष्मी मंदिर परिसरात बायोटॉयलेट विकसित करणे, उद्यमनगर परिसरातील पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सोडविण्यासाठी पाठपुरावा करणार असल्याचे भाजपकडून जाहीरनाम्यात सांगण्यात आले आहे.