पैशाअभावी जामखेड आगाराला मिळेना डिझेल; काही बससेवा ठप्प

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर Live24 टीम, 15 सप्टेंबर 2021 :- महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाला कोरोना महामारीचा फटका बसला असून, प्रवाशांच्या संख्येत कमालीची घट झाली आहे. अशा परिस्थितीत इंधन दरवाढ गगनाला भिडली आहे.

परिणामी राज्य परिवहन महामंडळाच्या बससेवेची चाके उलटी फिरू लागली. पैशाअभावी जामखेड आगाराला डिझेल मिळत नाही. जामखेड आगारात एकूण ५१ बसेस आहेत.

त्यापैकी चार शिवशाही आरामबस आहेत. या आगारातून पुणेसाठी १८, मुंबईसाठी ५, बारामतीसाठी २, करमाळासाठी ३,नाशिकसाठी २,कोल्हापूरसाठी २,सातारासाठी १, नगरसाठी ३ बसच्या फेऱ्या चालू आहेत.

कोरोना सुरू झाल्यापासून तालुकांतर्गत बससेवा पूर्ण बंद आहे. तर १४ बस कोकणातील गणपती उत्सवामुळे तेथे पाठवण्यात आल्या आहेत. जामखेड आगाराला बससाठी लागणारे डिझेल स्वत:च्या उत्पन्नातून आणावे लागते.

डिझेलचे वाढते दर व कोरोनामुळे प्रवाशांची कमी संख्या, तसेच खराब रस्त्यांमुळे बसचा वाढता खर्च पाहता बस आगाराला एक टँकर डिझेल आणण्यासाठी तारेवरची कसरत करावी लागते.

उत्पन्न कमी झाल्यामुळे संपूर्ण जामखेड आगार आठवड्यातून तीन दिवस बंद ठेवावा लागतो. गेल्या दोन दिवसांपासून तर आगारातून फक्त टपाल घेऊन जाणारी एकमेव बस सुटत आहे. जामखेड आगाराच्या आशेवर असलेल्या प्रवाशांना तासनतास इतर ठिकाणावरून येणाऱ्या बसची वाट पहावी लागते.