अहमदनगर Live24 टीम, 9 मे 2021 :- दिवसेंदिवस दिवस जामखेड शहराची कोरोना बाधितांची परीस्थिती बिकट होत आहे. शनिवारी प्रांताधिकारी अर्चना नष्टे यांच्या उपस्थितीत व्यापाऱ्यांसमवेत पार पडलेल्या बैठकीत जामखेड शहरात १० ते २० मे पर्यंत कडकडीत जनता कफ्र्यू सर्वांच्या संमतीने जाहीर करण्यात आला.
या वेळी प्रांताधिकारी अर्चना नष्टे, तहसीलदार विशाल नाईकवाडे, मुख्याधिकारी मिनीनाथ दंडवते, पोलिस निरीक्षक संभाजी गायकवाड, सभापती सूर्यकांत नाना मोरे, सावळेश्वर ग्रुपचे संचालक व सामाजिक कार्यकर्ते रमेश आजबे,
स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे तालुका प्रमुख मंगेश आजबे, शिवसेना तालुका उपप्रमुख संजय काशीद, व्यापारी सुरेश भोसले आदीसह अनेक व्यापारी उपस्थित होते.जामखेड शहरात कोरोना संसर्गाचा वेग झपाट्याने वाढत असताना मृत्यूच्या संख्येतही वाढ होत आहे.
शासनाने संचारबंदी लागू केली असली तरी काही प्रमाणात शिथिलता दिली आहे. परंतु, जामखेडकरांकडुन शासनाच्या सौजन्याचादेखील गैरफायदा घेत रस्त्यावर गर्दी दिसून येत असल्याने उद्देश सफल होत नाही. त्यामुळे जामखेड शहरातील स्थानिक व्यापाऱ्यांनी पुढाकार घेत
आज प्रांताधिकारी अर्चना नष्टे यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत जनता कफ्र्यू लावण्याचा एकमुखी निर्णय या बैठकीत घेण्यात आला. मात्र कृषी सेवा केंद्र व किराणा दुकानांचा बाहेरगावाहून माल घेऊन येणाऱ्या मालवाहतूक करणाऱ्या मोठ्या वाहनांना माल खाली करण्यासाठी सवलत देण्यात आली आहे.
तसेच शनिवार व रविवारी असे दि. ८ ते ९ तारखेला दोन दिवस सकाळी सात ते अकरा वाजेपर्यंत दुकाने सुरू ठेवण्यात येणार असून, पुढील १० ते २० मे पर्यंत अत्यावश्यक सेवा दिवसभर व दूध विक्री सकाळी अकरा वाजेपर्यंत सुरू रहाणार आहे.