अहमदनगर Live24 टीम, 12 जून 2021 :-मेकॅनिकची नोकरी सोडून गावाकडे आलेल्या सांगली जिल्ह्यातील जत तालुक्यातील अंतराळ गावचे काकासाहेब सावंत यांनी एकाच आंब्याच्या झाडावर 22 जातीच्या आंब्याचे उत्पादन घेण्याचा अनोखा प्रयोग केला. हा प्रयोग यशस्वी झाला आहे.
काकासाहेब सावंत यांनी आयटीआयमधून डिप्लोमा केला आहे. ते पुण्यातील अनेक ऑटोमोबाईल कंपन्यांमध्ये एक दशकाहून अधिक काळ काम करत होते. हे काम केल्यानंतर काकासाहेब सावंत आता एक नर्सरी चालवतात. त्यातून त्यांना वर्षाकाठी ५० लाख रुपयांचे उत्पन्न मिळते.
हे करत असताना सावंत यांनी ३ वर्षांच्या आंब्याच्या झाडावर एक प्रयोग केला. यात त्यांनी २२ प्रकारच्या आंब्याची लागवड केली. सावंतांनी त्यांची शेती आंब्याची लागवड आणि बिगर आंब्याची लागवड अशा दोन गटात विभागली आहे. यात केशर या आंब्याची जातीची लागवड जवळपास 10 एकरांत केली आहे.
तर उर्वरित 10 एकरांमध्ये चिकू, डाळिंब, सीताफळ, हळद इत्यादींची लागवड केली जाते. सावंतांनी सरकारच्या विविध योजनांमधून सब्सिडीचा लाभ घेत ही नर्सरी सुरू केली आहे. अनेक वर्षे मेहनत घेत आणि आपल्या कामाचा पाठपुरावा करत त्यांनी यश मिळवले आहे.
सावंत यांनी नोकरी सोडून गाव गाठले. त्यानंतर शेती सुरू केली. काही दिवसांनी त्यांनी शासनमान्य श्री बनशंकरी नावाने नर्सरी सुरू केली.
या तालुक्यातील शेती निसर्गाच्या कृपेवर अवलंबून आहे. असे असतानाही मोठ्या हिंमतीने काकासाहेब सावंतांनी नर्सरी सुरू केली. नंतन आंब्याचा प्रयोग केला, त्यातही त्यांना यश मिळाले.