अहमदनगर Live24 टीम, 09 मार्च 2021:- श्रीगोंदा तालुक्यातील म्हसे, माठ, राजापूर, हिंगणी भागांतील घोड नदीपात्रात बेलवंडी पोलिस आणि महसूल विभागाने अवैध वाळुउपसा करणाऱ्या कोट्यवधी रुपये किंमतीच्या २५ यांत्रिक फायबर बोटी आणि सेक्शन बोटी जप्त करुन जिलेटीनच्या सहाय्याने नष्ट केल्या.
पोलिसांनी छापा टाकताच वाळूउपसा करणारे इसम हे नदीतील पाण्यात उड्या टाकून पळुन गेले. बेलवंडी पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक संपतराव शिंदे आणि श्रीगोंदा तहसीलदार प्रदिप पवार यांना गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली की,
बेलवंडी पोलीस स्टेशन हद्दीत म्हसे, माठ, राजापुर, हिंगणी, माळवाडी, खेडकर वस्ती येथील घोडनदी पात्रात काही इसम यांत्रिक फायबर बोटीच्या सहाय्याने विनापरवाना अवैध वाळुचा उपसा करीत आहेत.
त्यावरुन त्यांनी या ठिकाणी छापा टाकला. मात्र पोलिसांना पाहताच फायबर बोटी व सेक्शन मधील इसम नदीतील पाण्यात उड्या मारुन पळुन गेले.
पोलिसांनी २५ फायबर बोटी व सेक्शन असा कोट्यवधी रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करुन जिलेटीनच्या सहाय्याने नष्ट केला. बोटींच्या साह्याने अवैध वाळू उपसा करणाऱ्या आरोपीविरुध्द बेलवंडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला.