अहमदनगर Live24 टीम, 9 मे 2021 :- शिर्डी येथे ४२०० बेडचे जम्बो कोविड सेंटर चालू करण्यास राज्य शासनाने परवानगी दिली असल्याची माहिती खासदार सदाशिव लोखंडे यांनी आज शिर्डी येथे पत्रकार परिषदेत दिली.
दिवसेंदिवस वाढणारी कोरोना रुग्णांची संख्या व त्या तुलनेत अपुरी पडणारी उपचार यंत्रणा या पार्श्वभुमीवर खा.लोखंडे यांनी शिर्डीत संस्थानकडे असलेल्या पायाभुत सुविधांकडे लक्ष वेधत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना शिर्डीत ४२०० खाटांचे जम्बो कोविड सेंटर सुरू करण्याबाबत मागणी केली होती.
या प्रस्तावाला मुख्यमंत्री ठाकरे यांनी तातडीने मान्यता दिली असल्याचे लोखंडे यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. यावेळी शिवसेनेचे कमलाकर कोते, संजय शिंदे, सचिन कोते आदी पदाधिकारी उपस्थित होते.
उत्तर अहमदनगर जिल्हयातील अकोले, संगमनेर, कोपरगाव, राहाता, श्रीरामपूर, राहुरी व नेवासा तसेच नाशिक जिल्ह्यातील सिन्नर व येवला आणि औरंगाबाद जिल्ह्यातील वैजापुर अशा दहा तालुक्यातील रुग्णांसाठी हे कोविड रूग्णालय उपयोगी ठरणार आहे.
साईसंस्थानचे ५०० बेडचे हॉस्पिटल आहे, साई आश्रम १ व २ या भक्तनिवासातील रूम उपलब्ध आहेत. यामुळे शिर्डीत २००० ऑक्सिजन बेड, २००० बेडचे कोविड सेंटर व २०० आय.सी.यु.बेड असे जम्बो कोविड सेंटर चालू करण्यास राज्य शासनाकडे मंजुरीसाठी प्रस्ताव सादर करण्यात आला,
याबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सकारात्मक निर्णय घेत विधी व न्याय विभागास शिर्डी येथे जम्बो कोविड सेंटर चालू करण्यास आदेश दिले,
सर्व कायदेशीर बाबींची पूर्तता करून दि ७ मे २०२१ रोजी विधी व न्याय विभागाने साईसंस्थानच्या मुख्यकार्यकारी अधिकाऱ्यांना ४२०० बेडचे कोविड सेंटर चालू करण्यास पत्राद्वारे कळविले असल्याचे खा.लोखंडे यांनी सांगितले.