अहमदनगर Live24 टीम, 07 फेब्रुवारी 2021:- सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती एम. आर. शहा यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची प्रचंड स्तुती केली आहे. न्यायमूर्ती शहा यांनी मोदी हे सर्वात प्रिय, लोकप्रिय आणि दूरदर्शी नेते असल्याचे म्हटले आहे.
गुजरात उच्च न्यायालयाला ६० वर्षे पूर्ण झाल्याबद्दल आयोजित समारंभात न्यायमूर्ती शहा बोलत होते. व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे झालेल्या या कार्यक्रमात न्यायमूर्ती शहा म्हणाले, ‘या समारंभात सहभागी झाल्याने मला अभिमान आणि आनंद वाटत आहे. तेही आमचे सर्वात प्रिय, लोकप्रिय, जिवंत आणि दूरदर्शी नेते माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत.’
न्यायमूर्ती शहा यांनी गुजरात उच्च न्यायालयात वकील म्हणून २२ वर्षे प्रॅक्टिस केली. नंतर १४ वर्षे न्यायमूर्ती होते. त्यांनी २०१८ मध्येही पंतप्रधान मोदींची स्तुती करताना त्यांना ‘मॉडेल आणि हीरो’ संबोधले होते. त्याच वर्षी त्यांची पाटणा उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायमूर्तिपदी नियुक्ती झाली होती.
या कार्यक्रमात गुजरात हायकोर्टाचे मुख्य न्यायमूर्ती विक्रम नाथ यांनीही मोदींची स्तुती केली. ते म्हणाले, राष्ट्राप्रति आपले कर्तव्य पार पाडताना त्यांनी एका सुरक्षित जगाचा संकल्पही पूर्ण केला आहे.’