Ahmednagar News : के.के. रेंजच्या भूसंपादनाचा मुद्दा परत एकदा चर्चेत ! आमदार लंके म्हणाले…

Published by
Ahmednagarlive24 Office

Ahmednagar News : दोन वर्षांपूर्वी ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्यामार्फत राजनाथ सिंह यांची भेट घेऊन त्याच वेळी हा विषय थांबविण्यात आला आहे, असे असतानाही लष्कराने पुन्हा भूसंपादनाचा प्रस्ताव दिला असून, तो आताच समोर का आला, याचे आकलन होत नाही.

भूसंपादनाबाबत सर्व अधिकार राज्य सरकारचे आहेत. राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजिदादा पवार, देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन आपण या प्रस्तावास विरोध करणार आहोत.

कोणत्याही परिस्थितीत हा प्रस्ताव मंजूर होऊ देणार नाही व भूसंपादनही होऊ देणार नाही, असे आ. नीलेश लंके यांनी मध्यम प्रतिनिधींशी बोलताना सांगितले.

आ. लंके म्हणाले दोन वर्षांपूर्वी लष्कराकडून के. के. रेंजच्या विस्तारासाठी भूसंपादनाचा प्रस्ताव आल्यानंतर नाशिक, नगर येथील कागदपत्रांचे संकलन करण्यात येऊन शरद पवार यांच्या नेतृत्वाखाली आपण संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांची भेट घेतली होती.

तीन तास चाललेल्या या बैठकीत शरद पवार यांनी दुष्काळी असलेल्या या भागात मुळा धरणामुळे समृध्दी आली असून, तेथील शेती बागायती झाली आहे. जनावरांचे गोठे, दुग्ध उत्पादन यामुळे येथील नागरिकांचे जीवनमान उंचावत आहे.

या भागात मोठया प्रमाणावर आदिवासी समाज वास्तव्यास असून, वन जमिनींवर त्यांची उपजीविका अवलंबून आहे. यापूर्वी या भागातील जमिनीचे के. के. रेंजसाठी भूसंपादन करण्यात आले आहे. आणखी भूसंपादन केल्यानंतर सरावादरम्यान करण्यात येणाऱ्या स्फोटामुळे मुळा धरणास धोका होऊ शकतो.

धरण फुटले तर राहुरी, नेवाशासह मराठवाडयातील गावे वाहून जातील, अशी माहिती यावेळी देण्यात आली होती. संपूर्ण माहिती घेतल्यानंतर संरक्षणमंत्री सिंह यांनी हा विषय इथेच थांबविण्यात येत असून भूसंपादन होणार नसल्याचे जाहीर केले होते, असे आ. लंके यांनी सांगितले.

Ahmednagarlive24 Office