अहमदनगर Live24 टीम, 16 सप्टेंबर 2021 :- निमगाव वाघा (ता. नगर) येथे नेहरु युवा केंद्र व जिल्हा क्रीडा कार्यालय संलग्न नवनाथ विद्यालय, स्व.पै.किसनराव डोंगरे बहुद्देशीय संस्था, श्री नवनाथ युवा मंडळ व धर्मवीर ग्रामीण सार्वजनिक वाचनालयच्या वतीने जिल्हा परिषदचा आदर्श शिक्षक पुरस्कार भरत कांडेकर यांना
जाहीर झाल्याबद्दल व सरपंच परिषदेच्या जिल्हाध्यक्षपदी आबासाहेब सोनवणे यांची निवड झाली असता त्यांचा सत्कार करुन सत्कारमुर्तींच्या हस्ते वृक्षरोपण करण्यात आले. गावातील नवनाथ विद्यालयात झालेल्या कार्यक्रमाप्रसंगी ग्रामपंचायत सदस्य तथा डोंगरे संस्थेचे अध्यक्ष पै. नाना डोंगरे, मुख्याध्यापक किसन वाबळे,
मुकुंद दुबे, काशीनाथ पळसकर, निळकंठ वाघमारे, दत्तात्रय जाधव, क्रीडा शिक्षक चंद्रकांत पवार, शुभांगी धामणे, मंदा साळवे, सुवर्णा जाधव, युवा मंडळाचे अध्यक्ष संदिप डोंगरे, सचिव प्रतिभा डोंगरे, संतोष रोहोकले आदी उपस्थित होते. पै. नाना डोंगरे म्हणाले की,
समाजात विविध कार्यक्रम, सण, उत्सव साजरे करताना त्याला पर्यावरण संवर्धनाची जोड देणे आवश्यक आहे. संस्थेच्या वतीने गणेशोत्सव काळात पर्यावरण संवर्धनावर विविध उपक्रम राबविण्यात येत असून, शिक्षक पुरस्कार मिळालेले व सरपंच परिषदेच्या जिल्हाध्यक्षपदी नियुक्ती झालेल्यांच्या हस्ते वृक्षरोपण अभियान राबविण्यात आल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर झालेले भरत कांडेकर यांनी डोंगरे संस्था व नवनाथ युवा मंडळाच्या सामाजिक कार्याचे कौतुक केले.
आबासाहेब सोनवणे यांनी डोंगरे सामाजिक संस्था आणि नवनाथ युवा मंडळाचे सामाजिक व पर्यावरण संवर्धनासाठी सुरु असलेले कार्य दिशादर्शक व प्रेरणादायी असल्याचे त्यांनी सांगितले. उपस्थितांचे आभार मुख्याध्यापक किसन वाबळे यांनी मानले.