अहमदनगर Live24 टीम, 18 मार्च 2021:- सचिन वाझे यांनी राष्ट्रीय तपास यंत्रणेला सर्व माहिती दिली तर मोठा विस्फोट होईल. या सगळ्यात महाराष्ट्र सरकार सामील नाही तर पोलीस आयुक्तांची बदली का करण्यात आली? NIA ने वाझेंना मुंबई पोलिसांपासून दूर ठेवावे.
अन्यथा त्यांचाही मनसुख हिरेन होऊ शकतो, अशी भीती भाजप खासदार नवनीत राणा यांनी व्यक्त केली. आगामी काळात सचिन वाझे प्रकरणावरुन महाराष्ट्रात मोठा भूकंप होऊ शकतो. फक्त पोलीस आयुक्तांना दूर करून हे प्रकरण संपणार नाही. याचे धागेदोरे महाराष्ट्र सरकारच्या अवतीभवती फिरत आहेत.
देवेंद्र फडणवीस मनसुख हिरेन यांना संरक्षण देण्याची मागणी करत होते. मात्र, त्यांचा खून झाला. त्याचप्रमाणे सचिन वाझे यांचाही हत्या केली जाण्याची शक्यता आहे, असा दावा रवी राणा यांनी केला. अंबानी स्फोटक प्रकरणाचे पडसाद आता दिल्लीत उमटू लागले आहेत. राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस बुधवारी दिल्लीत गेले होते.
याठिकाणी त्यांनी पत्रकारपरिषदही घेतली. यानंतर रात्री उशीरा देवेंद्र फडणवीस नरेंद्र मोदी, अमित शाह आणि भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी.नड्डा यांना भेटल्याचे समजते. या सर्व नेत्यांमध्ये जवळपास एक तास चर्चा सुरु होती. त्यामुळे दिल्लीत मोठ्या घडामोडी घडण्याची शक्यता आहे.
सध्या राष्ट्रीय तपास यंत्रणेच्या ताब्यात असलेल्या सचिन वाझे यांनी विशेष न्यायालयात एक अर्ज सादर केला आहे. यामध्ये त्यांनी आपल्याला वकिलाशी एकांतात बोलून द्यावे, अशी मागणी केली आहे. मी वकिलाशी बोलत असताना NIA चे अधिकारी आमच्यावर नजर ठेवतात.
मात्र, मला वकिलाशी खासगी गोष्टींबाबत एकांतात बोलायचे आहे, असे सचिन वाझे यांनी म्हटले आहे. सचिन वाझेंच्या या अर्जावर गुरुवारी न्यायालायत सुनावणी होणार आहे