अहमदनगर Live24 टीम, 9 ऑगस्ट 2021 :- कोपरगाव तालुक्यातील भोजडे येथील ससाणे वस्ती परिसरात अनेक दिवसापासुन दिवस रात्र विजेचा खेळ खंडोबा सुरू असून अचानक कधी पण येते आणि कधी पण जाते या मुळे शेतकऱ्यांचा घरातील विजेची उपकरणे जळून मोठे नुकसान होत आहे.
तसेच वाढत्या कोरोना च्या पार्श्वभूमीवर शासनाकडून सध्या ऑनलाइन शिक्षण सुरू असून या विजेच्या लपंडावमुळे भ्रमणध्वनी चार्ज करणे शक्य होत नसल्याने मुलाचे देखील शैक्षणिक नुकसान होत आहे.
या वेळी अवेळी येणाऱ्या विजेमुळे भरपूर भ्रमणध्वनी खराब झालेच त्याचबरोबर दहेगाव व भोजडे शिवारात बिबट्याचे दररोजच दर्शन होत असल्याने शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
वनविभागाने तातडीने पिंजरा लावुन बिबट्याचे तातडीने बंदोबस्त करण्यात यावा अशी मागणी करुन देखील बंदोबस्त होत नसल्यामुळे परिसरातील शेतकऱ्यांनी नाराजी व्यक्त केली आहे. राज्यातील बहुतांश भागात पावसाने दडी मारल्याने शेतात पेरलेली पिके जळून जात आहे.
हातातोंडाशी आले पिक वाया जावु नये यासाठी यासाठी लागेल प्रयत्न करत आहे तर दुसरीकडे पावसाचा नैसर्गिक संकटामुळे अडचणीत सापडलेला शेतकरी नेहमी ये जा करत असलेल्या या विजेचा लपंडावमुळे अधिकच अडचणीत सापडला असुन अनेक समस्यांना बळीराजा सामोरे जात आहे.
वेळेचे बंधन नसल्याने कधीही येणाऱ्या विजेमुळे शेतकऱ्यांस शेतातील पिकांना पाणी देण्यास रात्री दिवसा कधीही जावे लागते परंतु यासाठी रात्रीचे घराबाहेर पडावे तर परिसरात बिबटे वावरतांना दिसत असल्यामुळे शेतातील पिके वाचवायला जायचे की आपला जीव वाचवायचा अशा दुहेरी संकटात सध्या बळीराजा सापडला असून
लवकरात लवकर शासनाने व विभागाने लाईटचा प्रश्न तातडीने मार्गी लावावा तसेच बिबट्यांचा पिंजरा लावुन त्वरीत बंदोबस्त करावा त्वरीत न झाल्यास शेतकरी रस्त्यावर उतरल्याशिवाय राहणार नाही. असा इशारा परिसरातील शेतकऱ्यांनी दिला आहे.