वाळूच्या टेम्पोसह महसूल कर्मचाऱ्यांचे अपहरण

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर Live24 टीम,  14 फेब्रुवारी 2022 :- नायब तहसीलदार पुनम दंडिले या दिनांक १२ फेब्रुवारी रोजी मुळा नदी पात्रात चोरटी वाळू वाहतूक करणाऱ्या टेम्पोला ताब्यात घेऊन कारवाई करत होत्या.

त्यावेळी दोन आरोपींनी साक्षीदाराचे अपहरण करून वाळूचा टेम्पो पळवून नेला. याबाबत दोघां जणांवर अपहरण व सरकारी कामात अडथळा आणल्याचा गुन्हा दाखल करण्यात आलाय.

राहुरी येथील महसूल विभागातील नायब तहसीलदार पुनम महादेव दंडिले या एका कर्मचाऱ्याला सोबत घेऊन दिनांक १२ फेब्रुवारी रोजी रात्री दहा वाजे दरम्यान राहुरी तालुक्यातील पिंपरी वळण भागात गस्त घालत होत्या.

त्यावेळी आरोपी हे मुळा नदीपात्रात टेम्पोमधून चोरटी वाळू वाहतूक करत असताना दिसले. त्यावेळी तहसीलदार दंडिले यांनी एका कर्मचाऱ्याला टेम्पोमध्ये बसवून टेम्पो राहुरी येथील तहसील कार्यालयाच्या आवारात घेण्यास सांगितले. मात्र आरोपींनी टेम्पो तहसील कार्यालयाच्या आवारात न आणता टेम्पोचा वेग वाढवून टेम्पो व कर्मचाऱ्याला घेऊन वळण पिंप्री, खेडले परमानंद सोनईच्या दिशेने वेगात घेऊन गेले.

पुढे जाऊन साक्षीदार कर्मचारीचा मोबाईल हिसकावून घेतला. तसेच त्याला टेम्पोच्या खाली उतरून दिले. आणि शिवीगाळ दमदाटी केली.

तसेच ५ लाख रूपये किंमतीचा टेम्पो व २० हजार रूपये किंमतीची दोन ब्रास वाळू असा एकूण ५ लाख २० हजार रूपये किंमतीचा मुद्देमाल घेऊन आरोपी पसार झाले.

नायब तहसीलदार पुनम महादेव दंडिले यांनी राहुरी पोलिसात दिलेल्या फिर्यादीवरून आरोपी अमोल बर्डे व त्याच्या बरोबर आणखी एक अनोळखी तरूण अशा दोघांवर अपहरण, सरकारी कामात अडथळा निर्माण करणे तसेच दमदाटी करण्याचा गुन्हा दाखल करण्यात आलाय.

या घटनेचा पुढील तपास पोलिस निरीक्षक प्रताप दराडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उप निरीक्षक भागचंद सुर्यवंशी हे करीत आहेत.