अहमदनगर Live24 टीम, 5 सप्टेंबर 2021 :-जुन्या वादाचा बदला घेण्यासाठी एका तरुणावर चौघांनी चाकू हल्ला करीत त्याचा खून केल्याची घटना पाथर्डी तालुक्यात घडली आहे. या हल्ल्यात राजेंद्र रामकिसन जेधे (वय ३३) याचे निधन झाले आहे.

दरम्यान याप्रकरणी पोलिसांनी चौघांवर खुनाचा गुन्हा दाखल केले असून तिघांना अटक केली आहे. याबाबत अधिक माहिती अशी कि, प्रशांत बबन शेळके व राजेंद्र रामकिसन जेधे यांच्यात सुमारे दोन वर्षांपूर्वी गावातील लग्नात नाचण्याच्या कारणावरून मारामारीचा प्रकार घडला होता.

त्या घटनेचा राग मनात धरून शेळके व त्यांच्या साथीदारांनी राजेंद्र जेधे यांच्या घराच्या पडवीच्या बाहेर जेधे यांस पकडले. शिवीगाळ करीत मारहाण करण्यास सुरुवात केली. प्रशांत बबन शेळके याने धारदार चाकूने जेधे यांच्या पोटाच्या उजव्या बाजूस वार केला.

त्यानंतर जेधे यांना नातेवाइकांनी पाथर्डी उपजिल्हा रुग्णालयात उपचांरासाठी दाखल केले. मात्र, उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला. या खून प्रकरणी पाथर्डी पोलीस ठाण्यात प्रशांत बबन शेळके, किशोर बाबासाहेब शेळके, प्रवीण बबन शेळके,

बबन जगन्नाथ शेळके (सर्व रा. खेर्डे) यांच्याविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यातील तिघांना पोलिसांनी ताब्यात घेतले असून पुढील तपास पोलीस निरीक्षक सुहास चव्हाण करत आहेत.