किरीट सोमय्या आज पारनेर मध्ये ! चर्चा एकच…..

मोफत मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

अहमदनगर Live24 टी म, 23 सप्टेंबर 2021 :- माजी खासदार किरीट सोमय्या यांच्या आजच्या (गुरूवार) पारनेर दौऱ्याच्या पार्श्‍वभुमिवर पोलिस प्रशासन सतर्क झाले असून पारनेर शहरासह पारनेर कारखान्याच्या परिसरात कडेकोट बंदोबस्त लावण्यात आला आहे.

सकाळी साडेआकरा वाजण्याच्या सुमारास सोमय्या हे पारनेर कारखान्यावर पोहचणार असून तेथील प्रशासनाकडून माहीती घेतल्यानंतर ते कामगार वर्गाशी चर्चा करणार आहेत.

त्यानंतर पारनेर येथे त्यांची पत्रकार परिषद होणार आहे. सोमय्या यांच्या स्वागताची पारनेर कारखाना बचाव समितीसह भाजपाच्या तालुका शाखेनेही जोरदार तयारी केली असून ते कारखान्याच्या विक्रीतील गैरव्यवहार तसेच इतर राजकिय बाबींवर काय भाष्य करणार ? याची उत्सुकता आहे.

पारनेरमध्ये सत्ताधारी राष्ट्रवादी काँग्रेसचे नीलेश लंके हे आमदार असून सोमय्या यांनी विशेषतः राष्ट्रवादीच्या नेत्यांनाच लक्ष्य केलेेले आहे. त्या पार्श्‍वभुमिवर पारनेरमध्ये काही अनुचित प्रकार घडू नये याचीही काळजी घेण्यात येत आहे.

राज्यपालांनी मुख्यमंत्र्यांना पाठविलेल्या पत्रानंतर मुख्यमंत्र्यांनीही राज्यपालांना पत्र पाठवून जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. त्यानंतर भाजपाच्या महिला आघाडीच्या प्रदेशाध्यक्ष चित्रा वाघ यांनी मुख्यमंत्र्यांवर टिका करताना आमदार नीलेश लंके तसेच युवक राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष मेहबूब शेख यांच्यावरही टिकेची झोड उठविली होती.

दोघांचाही त्यांनी एकेरी भाषेत उल्लेख केला. तहसिलदार ज्योती देवरे यांची बाजू घेताना वाघ यांनी त्यांच्यावरील भ्रष्टाचाराच्या आरोपांकडे सोईस्करपणे दुर्लक्ष केले.

दुसरीकडे भ्रष्टाचाराचे आरोप करीत भाजपाचे नेते किरीट सोमय्या हे राष्ट्रवादीला लक्ष्य करीत आहेत. भाजपाच्या या परस्पर विरोधी भूमिकेमुळे राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांच्या भावनाही तिव्र आहेत.

या अनुषंगाने पोलिस प्रशासनाने कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून चोख बंदोबस्त तैनात केलेला आहे.