अहमदनगर Live24 टीम, 5 मे 2021 :-शेवगाव तालुक्यातील बोधेगावसह ३५ गावासाठी बोधेगाव ग्रामीण रूग्णालयात ५० बेडचे सुसज्ज कोविड सेंटर सुरू करण्याचे आदेश पालकमंत्री यांनी दिले असून लवकरच हे सेंटर सुरू होणार असल्याची माहिती जिल्हा परिषद अध्यक्षा ना.राजश्रीताई घुले यांनी दिली आहे.
नगर येथे ना.मुश्रीफ यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या आढवा बैठकीत सौ.घुले यांनी बोधेगाव येथील ग्रामीण रुग्णालयात कोविड सेंटर सुरू करण्याची आगृही मागणी केली होती. घुले यांच्या खास प्रयत्नातुन हे सेंटर सुरू होत आहे. मागील आठवडयात सौ.घुले यांनी बोधेगाव भागाचा कोविड पाहणी दौरा केला होता.
माजी जि.प.सदस्य आणि बोधेगावचे उपसरपंच नितीन काकडे, कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती रामनाथ राजपुरे, बालमटाकळी विविध कार्यकारी सेवा सोसायटीचे माजी चेअरमन प्रशांत देशमुख, व्यंकटेश मल्टीस्टेटचे उपाध्यक्ष व्यंकट देशमुख,
युवा नेते सचिन घोरतळे, सरपंच सुभाष पवळे, माजी सरपंच रामजी अंधारे, हातगावचे सरपंच अरूण मातंग, कांबीचे सरपंच नितेश पारनेरे, सुकळीचे सरपंच प्रल्हाद देशमुख आदींनी बोधेगाव ग्रामीण रुग्णालयात शासकीय कोविड सेंटर सुरू करण्याची मागणी सौ.घुले यांचेकडे केली होती.
कोविड सेंटरसाठी लागणारी साधनसामग्री देखील बोधेगाव ग्रामीण रुग्णालयात प्राप्त झाले आहे. सर्व सोयीयुक्त मोफत शासकीय कोवीड सेंटरमुळे परिसरातील गरिबांना फार मोठा आधार मिळणार आहे.