अहमदनगर Live24 टीम, 8 जून 2021 :- जिल्ह्यात गुन्हेगारी वाढू लागली आहे. यामुळे सर्वसामन्यांमध्ये मोठे दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
जिल्ह्यात वाढत्या गुन्हेगारीला आळा घालण्याची जबाबदारी पोलीस प्रशासनासमोर आहे. मात्र अपुऱ्या कर्मचाऱ्यांच्या संख्येअभावी गुन्हेगारीला आळा बसविण्यात राहाता तालुक्यातील पोलीस प्रशासनाला अपयश येत आहे. राहाता शहर पोलीस ठाण्याला 22 गावासाठी फक्त 32 पोलीस कर्मचारी आहे.
परिणामी गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी पोलिसांची कमतरता जाणवते. या व्यतिरिक्त कोर्टकाम, साई मंदिर सुरक्षा, काकडी विमानतळ बंदोबस्त, पेट्रोलिंग, बिनतारी संदेश या कामकाजासाठी दररोज आठ ते दहा पोलीस कर्मचारी ड्युटी बजावतात व तीन ते चार मेडिकल रजेवर असतात.
वाहतूक शाखेसाठी व नाकेबंदी करण्यासाठी पोलिसांची आवश्यकता असल्यामुळे पोलिसांच्या अपुरे संख्याबळ पाहता 22 गावांसाठी प्रत्येकी एक पोलीस कर्मचारी उपलब्ध राहु शकत नाही. राहाता पोलीस ठाण्यात फक्त 6 पोलीस कर्मचारी शहराची कायदा-सुव्यवस्थेची धुरा सांभाळतात.
करोना परिस्थितीत अनेक गावात नागरिक नियमाचे पालन करीत नाही. त्यासाठी पोलीस बंदोबस्ताची गरज आहे. परंतु अपुरे संख्याबळामुळे गुन्हा दाखल होण्यापासून ते गुन्ह्याचा तपास लागेपर्यंत खूप दिवसाचा विलंब होतो. याचाच फायदा गुन्हेगाराला होतो.
पोलिसांना दैनंदिन ताण कमी करण्यासाठी जिल्हा पोलीस प्रमुख मनोज पाटील यांनी लक्ष घालून पोलीस संख्येत वाढ करावी जेणेकरून पोलिसांना मोठा दिलासा मिळेल.