अहमदनगर Live24 टीम, 18 एप्रिल 2021 :-आज देशात व राज्यात दिवसागनिक मोठ्या संख्येने कोरोनाचे रुग्ण वाढत आहेत. त्यामुळे या कोरोनावर नियंत्रण मिळवण्यासाठी प्रशासन प्रयत्न करत आहे.
तर दुसरीकडे अनेक भागात दिवसाढवळ्या घरफोडी करण्यात येत असल्याच्या घटना घडत आहेत. अशीच घटना कोपरगाव तालुक्यात घडली आहे.
याबाबत सविस्तर असे की, कोपरगाव तालुक्यातील वारी येथील जगताप वस्तीवरील शेतकरी दाम्पत्य शेतातील कामनिमित्त घराला कुलूप लावून शेतात गेले. याच संधीचा फायदा घेऊन अज्ञात चोरट्याने दिवसाढवळ्या घराचे कुलूप तोडून घरातील कपाटात उचकपाच केली.
कपाटातील सुमारे १ लाख ९८ हजार ७०० रुपयांचे विविध प्रकारचे सोन्याचे दागिने, तसेच ६० हजार रुपये रोख रक्कम असा एकूण २ लाख ४ हजार ७०० रुपयांचा मुद्देमाल चोरून नेला आहे. ही घटना शुक्रवारी (दि.१७) सकाळी १० ते १२ वाजेच्या सुमारास घडली आहे.
या प्रकरणी बाबासाहेब धोंडीराम जगताप, (वय ४९, रा.जगताप वस्ती, वारी शिवार, ता.कोपरगाव) यांच्या फिर्यादीवरून अज्ञात चोरट्याविरुद्ध कोपरगाव तालुका पोलीस ठाण्यात रात्री उशिरा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.