अहमदनगर Live24 टीम, 16 फेब्रुवारी 2021:- शासनाच्या भोगवटादार वर्ग दोनच्या जमिनीची बेकायदेशीर खरेदी-विक्री करून शासनाची फसवणूक केल्याप्रकरणी घेणार-देणार, साक्षीदार व संबंधीत अधिकारी तसेच या योजनेचा दुबार लाभ घेणार्यांवर गुन्हे दाखल होण्याच्या मागणीसाठी भ्रष्टाचार विरोधी जन आक्रोशच्या वतीने मार्केड चौकातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोर लाक्षणिक उपोषण करण्यात आले.
प्रारंभी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन उपोषणाची सुरुवात करण्यात आली. यामध्ये संघटनेचे पश्चिम महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष रघुनाथ आंबेडकर, पारनेर काँग्रेसचे तालुकाध्यक्ष संभाजी रोहोकले, अन्याय निवारण निर्मुलन सेवा समितीचे जिल्हाध्यक्ष अरुणराव रोडे, डॉ.अभिजीत रोहोकले, जिल्हा उपाध्यक्ष ज्ञानदेव हजारे, नगर तालुकाध्यक्ष युवराज हजारे, हरेश्वर साळवे, सचिन ठुबे, श्रीरंग रोहोकले, जगदीश आंबेडकर, संतोष भांड, भानुदास साळवे आदी सहभागी झाले होते.
मौजे भाळवणी (ता. पारनेर) येथे एका मागासवर्गीय कुटुंबाने शासनाकडून उदरनिर्वाहासाठी घेतलेली वर्ग दोनची गट नंबर 651 या जमिनीची विक्री केली. शासनाच्या भोगवटादार वर्ग दोनच्या जमिनीची बेकायदेशीर खरेदी-विक्री केल्याप्रकरणी सदर जमीन शासनास जमा करण्याचे अप्पर जिल्हाधिकारी यांनी आदेश दिलेले आहेत.
सदर व्यक्तींनी शासनाची फसवणुक केल्याचे सिध्द झाले आहे. या प्रकरणातील खरेदी देणार, घेणारम साक्षीदार व त्यांना मदत करणारे अधिकारी यांच्यावर फसवणुक केल्याप्रकरणी गुन्हे दाखल व्हावे. तसेच सदर कुटुंबाने एकाच योजनेचा दुबार लाभ घेऊन फसवणुकीने कोट्यावधी रुपयाची जमीन मिळवली आहे. त्यांच्या ताब्यातील गट नंबर 701/6 ही सरकारी जमीन शासनाकडे पुन्हा वर्ग करुन त्यांच्यावर कारवाई करण्याची मागणी संघटनेच्या वतीने करण्यात आली आहे.
सरकारने दलित, मागासवर्गीय भूमिहीनांना भोगवटादार म्हणून वर्ग दोनच्या सरकारी जमीन वाटप केले. पण भाळवणी (ता. पारनेर) येथील लँड माफियांनी कवडीमोल किमतीत मागासवर्गीयांच्या दारिद्रयाचा फायदा घेऊन लाभार्थ्यांकडून जमिनी लाटल्या. काही भूमिहीनांना शासनाला अंधारात ठेवून दप्तराच्या नोंदीत खाडाखोड करुन त्याचा दुबार लाभ घेतला.
शासनाची फसवणुक करणार्या अशा व्यक्तींवर तातडीने गुन्हे दाखल करण्याचे पश्चिम महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष रघुनाथ आंबेडकर यांनी म्हंटले आहे. एक महिन्यात संबंधीतांवर गुन्हे दाखल न झाल्यास विभागीय आयुक्त नाशिक कार्यालया समोर संघटनेचे संस्थापक अध्यक्ष भाऊसाहेब कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली बेमुदत उपोषण करण्याचा इशारा देण्यात आला आहे.