अहमदनगर Live24 टीम, 11 सप्टेंबर 2021 :-  गणेशोत्सवा निमित्त निमगाव वाघा (ता. नगर) येथे एकता फाऊंडेशनच्या वतीने युवकांचा मोफत अपघाती विमा काढण्याच्या अभियानाचे प्रारंभ स्टेट बँक ऑफ इंडिया चास शाखाचे शाखा व्यवस्थापक कमलेश रतनलाल मोतीश यांच्या हस्ते करण्यात आला.

गावातील स्टेट बँक ऑफ इंडिया ग्राहक सेवा केंद्रात अपघाती विम्याचे प्रमाणपत्र लाभार्थींना देण्यात आले. यावेळी एकता फाऊंडेशनचे अध्यक्ष अतुल फलके, ग्रामपंचायत सदस्य पै.नाना डोंगरे, रामदास पवार, बबन शेळके, सचिन जाधव, सतीश उधार, रविंद्र ढगे, प्रदिप शिंदे आदी उपस्थित होते.

अतुल फलके म्हणाले की, अपघाती व आरोग्य विमा प्रत्येकासाठी गरजेची गोष्ट बनली आहे. येणारे संकट सांगून येत नाही. यासाठी त्या संकटात सावरण्यासाठी विमा आवश्यक आहे. यामुळे आपल्या कुटुंबाला एक प्रकारचे संरक्षण प्राप्त होत असल्याचे त्यांनी सांगितले.

स्टेट बँक ऑफ इंडियाचे कमलेश मोतीश यांनी गावातील ग्रामस्थांसाठी गणेशोत्सव काळात एकता फाऊंडेशनने घेतलेला उपक्रम दिशादर्शक असल्याचे सांगितले.

याप्रसंगी अरुण अंधारे, किरण जाधव, सागर फलके, विकास जाधव, हुसेन शेख, राहुल फलके, महेश फलके, सुधीर खळदकर कार्यक्रमासाठी उपस्थित होते. गावातील युवक व ग्रामस्थांसाठी एकता फाऊंडेशनच्या वतीने अपघाती विमा काढला जात असून, याचा लाभ घेण्याचे आवाहन ग्रामस्थांना करण्यात आले आहे.