अहमदनगर Live24 टीम, 24 जुलै 2021 :- रात्रीच्या वेळी दुचाकीस्वारांना अडवून लुटमार करणाऱ्या दोघाजणांना अटक करण्यात आली आहे. यामध्ये शुभम संजय सोमासे (वय-२१, रा. भेंडा, ता. नेवासा) व अक्षय कल्याण जाधव (वय- २३, रा. कुकाणा, ता.नेवासा) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहे.
दरम्यान हि कारवाई स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने केली आहे. याबाबत अधिक माहिती अशी कि, ०२ जुलैच्या रात्री योगश बद्रीनाथ मगर ( वय ३२ रा. कोरडगाव ता. पाथर्डी) हे त्यांचे दुचाकीवरून कोरडगाव येथे जात असताना फुंदे टाकळी फाट्याचे पुढे आले असताना
पाठीमागून आलेल्या दोन अनोळखी इसमांनी मगर यांची दुचाकी अडवून त्यांना शिवीगाळ, दमदाटी करुन व चाकूचा धाक दाखवून त्यांच्याजवळील एकूण ३८ हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल बळजबरीने चोरुन नेला होता.
याप्रकरणी मगर यांनी पाथर्डी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती. या गुन्ह्याचा स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अनिल कटके हे तपास करीत असताना गोपनिय माहिती मिळाली कि, सदरचा गुन्हा शुभम सोमासे याने व त्याचे साथीदाराने मिळून केला आहे.
खात्रीशीर माहिती मिळाल्याने स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने भेंडा येथे जावून आरोपीचे वास्तव्याबाबत गोपनिय माहिती घेवून व आरोपीचा शोध घेवून आरोपी सोमासे व अक्षय जाधव यास कुकाणा येथून ताब्यात घेतले.