ताज्या बातम्या

मुंबईतील सात रेल्वे स्थानकांच्या नामांतरणासाठी विधिमंडळाची मान्यता, केंद्राच्या मंजुरीनंतर होणार अंमलबजावणी !

Published by
Ahmednagarlive24 Office

मुंबईतील करी रोड आणि सँडहर्स्ट रोड, तर पश्चिम रेल्वेच्या मरिन लाईन्स, चर्नी रोड आणि हार्बर रेल्वे मार्गावरील कॉटन ग्रीन, डॉकयार्ड आणि किंग्ज सर्कल या सात रेल्वे स्थानकांची नावे बदलण्याचा ठराव मंगळवारी विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहांमध्ये मंजूर करण्यात आला.

हा ठराव केंद्राकडे अंतिम मंजुरीसाठी पाठवण्यात येणार असून, त्यांच्या मंजुरीनंतर नामांतरणाचा मार्ग खुला होणार आहे. मुंबई लोकलच्या रेल्वे स्थानकांना असलेली ब्रिटिशकालीन ओळख पुसून नवी नावे द्यावीत, अशी मागणी शिवसेनेने केली होती.

राज्य सरकारने मंत्रिमंडळ बैठकीत त्याला तत्त्वतः मान्यता दिली. पारतंत्र्याच्या खुणा पुसून महाराष्ट्राची प्रादेशिक अस्मिता टिकवणे, मराठी संस्कृतीचा वारसा जपण्यासाठी रेल्वे स्थानकांची नावे बदलणार, असे त्यावेळी सांगण्यात आले होते.

सात स्थानकांची नावे बदलण्याचा ठराव विधानसभा आणि विधान परिषदेत मंत्री दादा भुसे यांनी मांडला. दोन्ही सभागृहांत तो मंजूर करण्यात आला. आता तो केंद्र सरकारकडे मंजुरीसाठी पाठवला जाणार आहे.

काय आहेत नवी नावे

करी रोड – लालबाग
सँडहर्स्ट रोड – डोंगरी
मरिन लाईन्स – मुंबादेवी
चर्नी रोड – गिरगाव
कॉटन ग्रीन – काळाचौकी
डॉकयार्ड – माझगाव
किंग्ज सर्कल – तीर्थंकर पार्श्वनाथ

Ahmednagarlive24 Office