अहमदनगर Live24 टीम, 7 मे 2021 :- जिल्ह्यात गेली अनेक दिवसांपासून बिबट्याच्या हल्ल्याच्या घटनांना रोख लागला होता. तसेच कोरोनामुळे बहुतांश नागरिक घरातच असल्याने
कोणावरही हल्ल्याची घटना ऐकण्यात नव्हती, मात्र नुकतेच बेलापुर खूर्द येथील एका शेतकऱ्यावर बिबट्याने हल्ला केल्याची घटना घडली आहे. बिबट्याच्या हल्ल्यात पंढरीनाथ श्रीपती महाडीक (वय ५७) असे जखमी झालेल्या शेतकऱ्याचे नाव आहे.
याबाबत अधिक माहिती अशी कि, बेलापुर खूर्द येथील शेतकरी पंढरीनाथ महाडीक हे रात्रीची लाईट असल्यामुळे आपल्या घासाच्या शेतात पाणी भरण्यासाठी गेले होते. रात्री 2 च्या सुमारास त्यांच्यावर अचानक बिबट्याने हल्ला केला सुदैवाने पंढरीनाथ यांच्या हातात काठी होती.
काठीच्या सहाय्याने त्यांनी बिबट्याचा प्रतिकार केला. या हल्ल्यात पंढरीनाथ यांच्या हात, पाय तसेच पोटावर जखमा झाल्या आहेत. त्यांनी आरडा ओरड केल्यानंतर त्यांच्या घरचे लोक पळत आल्यामुळे बिबट्या माघारी फिरला.
जखमी अवस्थेत त्यांच्या नातेवाईकांनी त्यांना बेलापुर प्राथमिक केंद्र येथे आणले तेथे प्राथमिक उपचार केल्यानंतर महाडीक यांना अहमदनगर येथील सिव्हील हाँस्पीटल येथे पाठविण्यात आले.
माणसावर हल्ला करणारा बिबट्या अजुनही परिसरात असल्याची पुष्टी होत आहे. त्यामुळे या परिसरात पिंजरा लावण्यात यावा अशी मागणी बेलापुर खूर्द येथील नागरीकांनी केली आहे.