अहमदनगर Live24 टीम, 10 एप्रिल 2021 :- जिल्ह्यात पुन्हा एकदा बिबट्याची दहशत सुरु झाली आहे. गेल्या काही दिवसांमध्ये बिबट्याचा वावर आढळून आला नव्हता.
मात्र आता पुन्हा एकदा जिल्ह्यातील उत्तरेकडील भागामध्ये बिबट्याकडून नागरिकांवर हल्ल्याच्या घटना घडू लागल्या आहे.
यातच संगमनेर तालुक्यातल्या निमगाव टेंबी येथे राहत असलेल्या ऋतूजा बाबासाहेब मोदड या अठरा वर्षीय युवतीवर बिबट्याने हल्ला केला.
यात ती गंभीर जखमी झाली. तिच्यावर संगमनेरच्या खासगी रुग्णालयात औषधोपचार सुरु आहेत. याबाबत अधिक माहिती अशी कि, ऋतूजा रात्रीच्या वेळी घरातून बाहेर आली असता अचानक बिबट्याने तिच्यावर हल्ला केला.
तिला ओढून नेले. मात्र तिने जोरजोराने आरडाओरड केल्यानंतर आजूबाजूच्या नागरिकांनी धाव घेतली. तोपर्यंत बिबट्याने धूम ठोकली.
तिला तातडीने उपचारार्थ खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. तिच्यावर करण्यात येणार्या उपचारासाठीचा सर्व खर्च वनविभागातर्फे करण्यात येणार आहे.
त्याच बरोबर बिबट्याला जेरबंद करण्यासाठी वनविभागाने त्याठिकाणी दोन पिंजरेही लावले आहेत, अशी माहिती वनरक्षक सी. डी. कासार यांनी दिली आहे.