अहमदनगर Live24 टीम, 31 मे 2021 :- गेल्या अनेक दिवसांपासून बिबट्या व त्याचा वावर व त्याच्या हल्ल्याच्या घटना घडल्याच्या ऐकण्यात नव्हते. मात्र आता पुन्हा एकदा त्याने आपली हजेरी लावण्यास सुरुवात केली आहे.
नुकतेच जिल्ह्यातील देवळाली प्रवरा येथील येवले वस्तीवर एका ऊसाच्या शेतात बिबट्याचे बछडे आढळून आले आहेत. या घटनेमुळे शेतकरी तसेच मजुरांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
याबाबत अधिक माहिती अशी कि, देवळाली प्रवरा येथील येवले वस्तीवर दुपारच्या सुमारास मजूर ऊस तोड करीत असतांना त्यांना साधारणत एक-दिड महिना वयाचे तिन बछडे ऊसाच्या सरीत आढळून आले.
या बाबत ऊस मालकाने वनविभागाला कळविले असता वनविभागाचे कर्मचारी घटनास्थळी आले व त्यांनी परिस्थितीची पाहाणी करुन वाघिण इथेच कुठेतरी जवळपास असल्याचे सांगून सर्वांना त्या ठिकाणाहून दूसरीकडे जाण्यास सांगितले.
माणसं बाजूला होताच काही वेळाने वाघिण त्या ठिकाणी आली व बछड्यांना घेऊन शेजारीच असलेल्या ऊसाच्या शेतात गेली. या बाबत शेतकऱ्यांनी वनविभागाला कळवून त्या ठिकाणी पिंजरा लावण्याची मागणी केली.
परंतू बछडे लहान असल्याने वाघिणीची व बछड्यांची ताटातूट झाल्यास ती आणखी हिंस्र होईल आणि त्यामुळे मानवी जिवाला धोका निर्माण होऊ शकतो. असे सांगितल्याने शेतकऱ्यांमध्ये आणखी घबराट पसरली आहे.