अहमदनगर Live24 टीम, 16 सप्टेंबर 2021 :- भरधाव वेगातील अज्ञात वाहनाच्या धडकेत रस्ता ओलांडणाऱ्या नर जातीचा बिबट्या ठार झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. दरम्यान हि घटना नाशिक-पुणे महामार्गावरील संगमनेर तालुक्यातील घारगाव शिवारात घडला आहे.
अधिक माहिती अशी कि, नाशिक-पुणे महामार्गावरील आळेखिंड, माहुली, चंदनापुरी, कर्हे घाट आदी परिसरात बिबट्यांचा वावर नेहमीच आढळून येतो. त्यामुळे अनेकदा बिबटे रस्ता ओलांडण्याच्या प्रयत्नात असताना वाहनांच्या धडकेत मरण पावतात.
बुधवारी पहाटेच्या साडे तीन वाजेच्या सुमारास सुमारे पाच वर्षांचा नर बिबटया रस्ता ओलांडत होता. त्याचवेळी नाशिककडून पुण्याच्या दिशेने जाणा-या भरधाव वेगातील अज्ञात वाहनाने त्याला जोरदार धडक दिली. या धडकेत बिबट्याचा जागीच मृत्यु झाला.
यानंतर मृत बिबट्याला पाहण्यासाठी या मार्गावरून प्रवास करणाऱ्या वाहनचालकांनी गर्दी केली. येथील स्थानिकांना ही बाब समजल्यानंतर त्यांनी वन विभागाला याची माहिती दिली.
वनविभागाच्या पथकाने घटनास्थळी धाव घेत बिबटयाच्या मृतदेहाचा पंचनामा करून मृत बिबट्या ताब्यात घेतला. पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांनी मृतदेहाचे शवविच्छेदन केल्यानंतर चंदनापुरी रोपवाटिकेत मृतदेहाचे दहन करण्यात आले आहे.