अहमदनगर Live24 टीम, 20 जून 2021 :- राहाता तालुक्यातील हनमंतगाव शिवारात लोणी- सोनगाव रस्त्यावर असलेल्या स्वातंत्र्य चौकात असलेल्या ब्राम्हणे- बनसोडे वस्तीजवळ शनिवारी (दि. १९) सकाळी ६ वाजेच्या सुमारास बिबट्या मृतावस्थेत आढळून आला.
अज्ञात वाहनाच्या धडकेने हा एक वर्षाचा नर बिबट्या मृत झाला असल्याचा प्राथमिक अंदाज आहे. लोणी, कोल्हार, सात्रळ, सोनगाव, पाथरे, हनमंतगाव या प्रवरा पट्ट्यातील गावांच्या परिसरात बिबट्यांचा वावर आहे. त्यामुळे अनेकदा बिबटे रस्ता ओलांडण्याच्या प्रयत्नात असताना वाहनांच्या धडकेत गतप्राण होण्याच्या घटना घडत असतात.
शनिवारी (दि.१९) पहाटेच्या सुमारास सुमारे एक वर्षाचा नर बिबट्या रस्ता ओलांडत असावा आणि त्याचवेळी भरधाव वेगातील अज्ञात वाहनाने त्याला जोरदार धडक दिली असावी. या धडकेतच बिबट्याचा जागीच मृत्यू झाला.
यानंतर या परिसरातील नागरिकांनी गतप्राण झालेल्या बिबट्याची माहिती लोणी बुद्रूक (ता.राहाता) येथील प्राणी मित्र विकास म्हस्के यांना कळविली. म्हस्के यांनी तात्काळ वनविभागाला याबाबत माहिती दिली.
वनपरीक्षेत्र अधिकारी प्रतिभा पाटील, वनपाल बी. एस. गाढे, वनरक्षक जी. बी. सुरासे, अरूण यादव यांनी घटनास्थळी भेट दिली. कोल्हार येथील पशुसंवर्धन अधिकारी दिलीप खपके यांनी बिबट्याची उत्तरीय तपासणी केली.
रावसाहेब ब्राम्हणे यांच्या शेतात बिबट्याला अग्नी देण्यात आला. यावेळी प्रविण विखे, देविदास म्हस्के, दीपक घोलप, प्रवीण ब्राह्मणे, विकास म्हस्के पंच म्हणून हजर होते.