अहमदनगर Live24 टीम, 19 जून 2021 :- जिल्ह्यात सध्या बिबट्यांनी धुमाकूळ घातला असून, त्यावर नियंत्रण ठेवण्याची जबाबदारी असलेले वनखाते मात्र बिबट्याला पकडण्यात पूर्णत: अपयशी ठरले आहे.
यातच आठ महिन्यांनंतर पाथर्डी तालुक्यातील जवखेडे खालसा येथील सरगड वस्तीवर बिबट्याचा वावर आढळून आला आहे. नगर जिल्ह्यात बिबट्यांचा नेहमीच संचार असतो. मात्र, जंगलात संचार करणारे बिबटे गेल्या काही वर्षापासून नागरीवस्तीत येऊन जनावरे व माणसांना लक्ष्य करत आहेत.
गेल्या आठ- पंधरा दिवसांत बिबट्या ग्रामस्थांना समक्ष दिसल्याच्या व काही जनावरांवर हल्ला केल्याच्या घटनाही घडल्या आहेत. यातच जवखेडे खालसा येथील दादासाहेब सरगड यांच्या वस्तीवर बिबट्याने शेळीची शिकार केली. वनकर्मचारी कानिफ वांढेकर यांनी त्या परिसरात फिरून ठसे घेतले.
शेळीच्या जखमांची नोंद घेत पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. राजेंद्र कांडेकर व वन अधिकारी दादासाहेब वाघुलकर यांनी पंचनामा केला. जवखेडे फिडरला सध्या रात्रीची वीज उपलब्ध आहे.
त्यामुळे उसाला पाणी देण्यास गेलेल्या सरगड यांना बुधवारी रात्रीही बिबट्याचे दर्शन झाले होते. जवखेडे, कामत शिंगवे, आडगाव, वाघोली, कोपरे ही गावे मुळा पाटचारीचे लाभक्षेत्रात आहेत.
सध्या पाटचारीला आवर्तन सुरू आहे. पिंजरा लावून बिबट्या जेरबंद करावा, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते अमोल गवळी, भारत वांढेकर यांच्यासह ग्रामस्थांनी केली आहे.
दरम्यान मानवी वस्तीत जर बिबट्याने धुमाकूळ घातला तर त्याला पकडण्यासाठी वनविभागाकडे पुरेशी यंत्रणा नसल्याचे जिल्ह्यातील अनेक घटनांवर लक्षात आले आहे.