अहमदनगर Live24 टीम, 2 जून 2021 :- जिल्ह्यात पुन्हा एकदा बिबट्याने धुमाकूळ घालण्यास सुरुवात केली आहे. अनेकदा शिकारीच्या नादात बिबट्याचा मृत्यू झाल्याची घटना याआधीही घडल्या आहेत.
यातच श्रीरामपूर तालुक्यात नर जातीचा बिबट्या मृत अवस्थेत आढळून आला आहे. याबाबत अधिक माहिती अशी कि, श्रीरामपूर तालुक्यातील टाकळीभान कारेगाव रस्त्यालगत एका शेतकऱ्याच्या शेतीमध्ये विहिरीजवळ नर जातीचा दिड वर्ष वयाचा बिबट्या मृत अवस्थेत दिसून आला.
या मृत बिबट्याची माहिती उपस्थितांनी वन विभागाला कळविली. माहिती मिळताच श्रीरामपूर येथील वनरक्षक विकास पवार यांनी घटनास्थळी येवून पंचनामा केला. या मृत बिबट्याने विषारी काहीतरी भक्षण केल्याने बिबट्याचा मृत्यू झाला असावा,
असा अंदाज वनरक्षक विकास पवार यांनी व्यक्त केला. डॉ. सानप हे बिबट्याचे शवविच्छेदन करणार असल्याची माहीती देण्यात आली. बिबट्या मृत अवस्थेत आढळून आल्याची माहिती समजताच ग्रामस्थांनी बिबट्याला पाहण्यासाठी मोठी गर्दी केली होती.