अहमदनगर Live24 टीम, 8 जुलै 2021 :- नगर जिल्ह्यात पुन्हा एकदा बिबट्याने धुमाकूळ घालण्यास सुरुवात केली आहे. बिबट्याच्या दहशतीने आधीच नागरिक घाबरले आहे.
यातच बिबट्याने थेट शाळेतच घुसण्याचा पर्यटन केल्याने नागरिकांच्या तोंडाचे पाणीच पळाले… जिल्ह्यातील पारनेर तालुक्यातील टाकळी ढोकेश्वर येथील केंद्रीय जवाहर नवोदय विद्यालयातील मेसमध्ये शिरलेल्या बिबट्याला वनविभागाच्या रेस्क्यू टीमने तब्बल सहा ते सात तासांच्या प्रयत्नानंतर जेरबंद केले.
याबाबत अधिक माहिती अशी कि, बुधवारी जवाहर नवोदय विद्यालयाच्या कुंपणावरून उडी मारून बिबट्या मेसमध्ये घुसला.
सध्या विद्यालय बंद असल्याने तेथे कोणी नव्हते. मात्र याची माहिती मिळताच टाकळी ढोकेश्वर येथील वनविभागाच्या कर्मचाऱ्यांनी टाकळी ढोकेश्वर, अहमदनगर व जुन्नर येथील रेस्क्यू पथके तातडीने बोलाविली. वन विभागाच्यावतीने भुलीचे इंजेक्शन मारण्यासाठी जुन्नर येथून शार्पशूटर बोलविण्यात आल्याची माहिती वनक्षेत्रपाल प्रताप जगताप व एस. एन. भालेकर यांनी दिली.
हा बिबट्या भक्षाच्या किंवा पाण्याच्या शोधार्थ नवोदय विद्यालयाच्या परिसरात आला असण्याची शक्यता टाकळी ढोकेश्वर येथील वन विभागाने व्यक्त केली आहे.
बिबट रेस्क्यू टीम ओतुर व बिबट निवारा केंद्र माणिकडोह यांच्या पथकाने बिबट्याला पिंजऱ्यात टाकून पुढील उपचारासाठी माणिकडोह बिबट निवारण केंद्र येथे नेले, अशी माहिती वनपाल साहेबराव भालेकर यांनी दिली.
या परिसरात दोन बिबटे होते. त्यापैकी एक जेरबंद झाला असून, अजून एक बिबट्या असल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे.