सर्वांच्या पाठबळाने कोरोना महामारी परतवून लावू -आमदार निलेश लंके

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम, 26 मे 2021 :- भाळवणी (ता. पारनेर) येथे पारनेर मतदार संघातील राष्ट्रवादीचे आमदार निलेश लंके यांनी उभारलेल्या भव्य कोविड सेंटरला निमगाव वाघा (ता. नगर) येथील ग्रामस्थांनी लोकवर्गणी करुन अकरा हजार रुपयाची मदत आमदार लंके यांच्याकडे सुपुर्द केली.

यावेळी निमगाव वाघाचे माजी सरपंच साहेबराव बोडखे, ग्रामपंचायत सदस्य पै. नाना डोंगरे, उद्योजक कोंडीभाऊ फलके, भाऊसाहेब ठाणगे, सुनिल जाधव, चंद्रकांत पवार, डॉ. सुनिल गंधे, बबन जाधव आदी उपस्थित होते.

भाळवणीत शरदचंद्रजी पवार आरोग्य मंदिर या नावाने सर्वसामान्यांसाठी भव्य असे कोविड सेंटर उभारण्यात आले आहे. या कोविड सेंटरच्या माध्यमातून कोरोना रुग्णांवर निशुल्क उपचार सुरु आहेत. आमदार निलेश लंके यांनी उभारलेल्या भव्य कोविड सेंटरची भुरळ राज्यासह परराज्यातील राजकीय मंडळी व नागरिकांना पडली आहे.

या कोविड सेंटरचे शिवधनुष्य पेळवण्यासाठी अनेक दानशूर व्यक्तीमत्वांसह सर्वसामान्य नागरिक देखील लोकवर्गणी करुन हातभार लावत आहे. नुकतेच निमगाव वाघाच्या ग्रामस्थांनी केलेली वर्गणी भाळवणीच्या कोविड सेंटरसाठी देण्यात आली.

भाळवणीचे कोविड सेंटर मानवतेचे मंदिर बनले असून, या मंदिरात मानवरुपी ईश्‍वरसेवा सुरु असल्याची भावना निमगाव वाघाचे माजी सरपंच साहेबराव बोडखे यांनी व्यक्त केली. ग्रामपंचायत सदस्य पै. नाना डोंगरे यांनी आमदार निलेश लंके यांनी कोरोना महामारीत सर्वसामान्यांना आधार दिला.

या कोविड सेंटरमधून जिल्ह्यातील कानाकोपर्‍यातून आलेले रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. भाळवणीचे आरोग्य मंदिरात जनसेवा होत असून, अनेकांना कोरोना महामारीत जीवदान मिळाले असल्याचे त्यांनी सांगितले.

आमदार लंके यांनी निमगाव वाघा ग्रामस्थांचे आभार माणून, समाजातील सर्वसामान्य घटकांकडून कोविड सेंटरसाठी मदतीचा ओघ सुरु आहे. सर्वांच्या पाठबळाने कोरोना महामारी परतवून लावण्याची अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.

अहमदनगर लाईव्ह 24