अहमदनगर Live24 टीम, 11 एप्रिल 2021 :- सर्व जगात कोरोनाची दुसरी लाट आली आहे. या लाटेचे स्वरूप फार गंभीर आहे. देशातही आहे, मात्र जास्तीचे प्रमाण महाराष्ट्रात आहे. काही बंधने लादली आहे.
परंतु उद्देश कोरोनाचा संसर्ग थांबवणे आहे. या संसर्गात नव्याने भर पडता कामा नये. संसर्ग रोखण्यासाठी कडक निर्णय घेऊ, अशी माहिती महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी दिली.
प्रांत कार्यालयातील आढावा बैठकीनंतर मंत्री थोरात पत्रकारांशी बोलत होते. ते म्हणाले, कोरोना पार्श्वभूमीवर महाविकास आघाडी सरकारने पहिल्यापासूनच काळजी घेतली.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे स्वतः लक्ष घालून निर्णय घेत आहेत. संसर्ग रोखण्यासाठी कडक निर्बंध लादले, परंतु याचा परिणाम संसर्ग थांबविण्यावर होईल का?, यावर विरोधकांना बरोबर घेत चर्चा सुरु आहे.
व्यापाऱ्यांचे नुकसान होत आहे, त्यांच्या भावनांशी आम्ही सहमत आहोत. मात्र ज्यांचे हातावर पोट आहे, त्यांची परिस्थिती अवघड आहे. कोरोना मानवतेवरील संकट आहे.
याला सामोरे जावे लागणार आहे. जिल्ह्यातही बाधित संख्या मोठी आहे. मृत्यूचे प्रमाण वाढले आहे. सर्वांचा उद्देश हाच असला पाहिजे, संसर्ग थांबून मृत्यू दर शून्यावर आला पाहिजे. यासाठी आवश्यक निर्णय घ्यावे लागणार असल्याचे मंत्री थोरातांनी यावेळी सांगितले.