पोलिओप्रमाणे घरोघरी जाऊन लसीकरण करावे; माजी महापौरांची मागणी

Published by
Ahmednagarlive24 Office

अहमदनगर Live24 टी म, 22 सप्टेंबर 2021 :- कोरोनाची वाढती साखळी तोडण्यासाठी लसीकरण हा सध्यातरी एक सक्षम उपाय समजला जातो आहे. मात्र लसीकरण केंद्रावर होणारी तुडुंब गर्दी व लसीचा तुटवडा यामुळे नागरिकांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत आहे.

यामुळे पोलिओप्रमाणे घरोघरी जाऊन लसीकरण करावे, अशी मागणी नगर शहराचे माजी महापौर भगवान फुलसौदर यांनी महापौर राेहिणी शेंडगे यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.

दरम्यान फुलसौंदर यांनी निवेदनात म्हटले आहे की, महापालिकेच्या सात आरोग्य केंद्रावर सध्या लस दिली जात आहे, परंतु अनेकांना केंद्रावर जाऊन लस घेणे शक्य नाही.

केंद्रावर आल्यानंतर लगेच लस मिळते, असे नाही. त्यासाठी नागरिकांना रांगा लावाव्या लागतात. त्यांचा वेळ जातो. त्यात सध्या लस मोठ्या प्रमाणात उपलब्ध होत आहे.

पूर्वी पोलिओची लस घरोघरी जाऊन दिली जात होती. त्यामुळे लस घेणाऱ्यांची संख्या वाढली. पोलिओप्रमाणे घरोघरी जाऊन लसीकरण करण्याचे महापालिकेने नियोजन करावे.

शहरातील प्रभागनिहाय घरोघरी जाऊन लसीकरण करावे, अशी मागणी फुलसौंदर यांनी निवेदनाद्वारे केली आहे. दरम्यान राज्यात कोरोनाची आकडेवारी घटत असताना मात्र नगर जिल्ह्यात कोरोनाबाधितांची दरदिवशी वाढती आकडेवारी हि प्रशासनासाठी डोकेदुखी ठरू शकते.

यामुळे नियमांच्या अंमलबजावणीबरोबरच लसीकरणाचा वेग वाढविणे आता काळाची गरज बनले आहे.

Ahmednagarlive24 Office