अहमदनगर Live24 टीम, 27 मे 2021 :- कोरोनाला रोखण्यासाठी लॉकडाऊन सुरू आहे. कोरोना व लॉकडाउनमुळे सर्वसामान्य जनतेला प्रचंड मोठा फटका बसला आहे. मात्र या काळात देखील संगमनेर तालुक्यात अवैध दारू विक्री केली जात आहे.
या बाबत माहिती मिळताच बेकायदेशीर दारूविक्री करणाऱ्या वेगवेगळ्या पाच ठिकाणी शहर पोलिसांनी कारवाई करून, देशी विदेशी दारूसह गावठी दारू बनवण्याचे साहित्य व एक वाहन असा तब्बल ५ लाख ४० हजारांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
या प्रकरणी पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. याबाबत सविस्तर माहिती अशी की, संगमनेरमध्ये काही ठिकाणी बेकायदेशीररित्या देशी विदेशी दारूची विक्री होत असल्याची
माहिती पोलिसांना समजली. त्यानुसार पोलीस निरीक्षक मुकुंदराव देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी गुंजाळवाडी, चिखली, समनापूर, देवगाव व खराडी येथे ही धडक कारवाई केली.
चिखली गावच्या परिसरात रामदास सूर्यभान रोहम याच्या जवळ विनापरवाना २ हजार ४९६ रुपये किंमतीची देशी दारू आढळली.
पोलिसांनी ५ लाख २० हजार रुपये किंमतीची पांढऱ्या रंगाची स्विफ्ट डिझायर गाडी जप्त केली. यानंतर राजापूर परिसरात राजू पिपळे हा म्हाळुंगी नदीपात्रात एका बाभळीच्या झाडाच्या आडोशाला दारूविक्री करताना आढळला.
या कारवाईत ८ हजार १०० रुपये किंमतीची गावठी दारू, कच्चे रसायन व दारू बनविण्याचे साहित्य जप्त करण्यात आले. पोलिसांना पाहून आरोपी पळून गेला. देवगाव येथील राजहंस रतन शिंदे हा घराच्या आडोशाला ५ हजार ५०० रुपये किंमतीच्या विदेशी दारूच्या बाटल्या विक्री करताना आढळून आला.
समनापूर येथे १३०० रुपयांची देशी दारू जप्त केली. शौकत आयुब शेख हा बेकायदेशीर देशी दारूची विक्री करत होता.
खराडी गावात येथे २ हजार ४९६ रुपयांची दारू जप्त केली तर अर्जुन भागाजी पवार हा फरार झाला आहे. शहर पोलिसांनी पाच कारवायांमध्ये एका आरोपीला ताब्यात घेतले आहे. तर साडे पाच लाखांचा मुद्देमाल जप्त केला आहे.