अहमदनगर Live24 टीम, 10 मे 2021 :- करोनाचा प्रादुर्भाव वाढल्याने राज्यभरात कडक निर्बंध लावण्यात आले आहेत. त्यात मद्यविक्रीदेखील बंद करण्यात आली आहे. यामुळे मद्यपींचे हाल सुरू झाले आहेत.
दरम्यान शासकीय तिजोरीमध्ये भर पडावी, यासाठी ऑनलाईन मद्यविक्री करण्यास सशर्त परवानगी देेण्यात आली आहे. जिल्ह्यात जानेवारी ते एप्रिलअखेर जिल्ह्यातील 461 जणांनी ऑनलाईन पद्धतीने मद्यप्राशन परवाना काढला आहे.
यात 144 जणांनी एक वर्षासाठी तर 317 जणांनी आजीवन मद्यप्राशन परवाना काढण्यास पसंती दिली आहे. यातून तीन लाख 36 हजार 135 रुपयांचा महसूल शासनाला जमा झाला आहे. करोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे जिल्ह्यात मद्यविक्री बंद झाली आहे.
मात्र ऑनलाईन मद्य खरेदी सुरू असल्याने त्यासाठी मद्यप्राशन परवाना बंधनकारक करण्यात आला आहे. त्यात मद्य खरेदी करणारा 18 वर्षावरील असावा तसेच त्याच्याकडे मद्यप्राशन करण्याचा परवाना असणे बंधनकारक करण्यात आले आहे.
त्यामुळे मद्यपींनी ऑनलाईन पद्धतीने मद्यप्राशन परवाना काढण्यास पसंती दिली आहे. त्यानुसार चार महिन्यांत जिल्ह्यात ऑनलाईनरित्या 467 जणांनी मद्यप्राशन परवान्यासाठी अर्ज केले होते.
यात सहा जणांचे अर्ज बाद करण्यात आले आहे. 144 जणांना एक वर्षांसाठी तर 317 जणांना आजीवन परवाना देण्यात आला असल्याचे राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून सांगण्यात आले.